मुंडे भगिनी ची उपस्थिती
बीड /परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क– अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने भाजपच्या वतीने सोमवारी २२ जानेवारीला वैद्यनाथ मंदिरासमोर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
येत्या सोमवारी अयोध्येतील श्रीराम मंदिराचा उदघाटन सोहळा मोठया आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडत आहे. यानिमित्ताने देशभरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून रामभक्तांमध्ये मोठा जल्लोष आहे. अयोध्येतील मंदिराचे सकाळी लोकार्पण झाल्यानंतर संध्याकाळी ६ वा. शहरात भाजपच्या वतीने वैद्यनाथ मंदिरासमोरील पायऱ्यांवर दीपोत्सव साजरा करून लक्ष लक्ष दिव्यांनी मंदिर परिसर उजळून टाकण्यात येणार आहे. यावेळी पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे उपस्थित राहणार आहेत. दीपोत्सव कार्यक्रमाला शहरातील रामभक्त, महिला भगिनी तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
रविवारी अयोध्यानगरातील राममंदिरात कार्यक्रम
————
जलालपूर रोडवरील अयोध्यानगरात रविवारी २१ तारखेला दुपारी १ वा. परिसरातील रामभक्तांनी राममंदिरात आयोजित केलेल्या कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमास पंकजाताई मुंडे उपस्थित राहणार आहेत, त्यांच्या हस्ते यावेळी महा आरती देखील करण्यात येणार आहे, या कार्यक्रमास देखील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.