मराठवाड्यातील जालना आणि नांदेड येथून धावणार दोन स्पेशल ट्रेन;  

धार्मिक पर्यटन /यात्रा/

राम भक्तांसाठी ‘आस्था’ स्पेशल ट्रेन

नांदेड : देशभरातील रामभक्तांना थेट अयोध्येत अयोध्याधाम सिकंदराबाद ही स्पेशल ट्रेन नेऊन श्रीराम लल्लाचे दर्शन घडविण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आंध्र-तेलंगणातील सिकंदराबाद, काझीपेठसह मराठवाड्यातील नांदेड, जालना रेल्वे स्थानकावरूनही वेगवेगळ्या ‘आस्था’ स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे. यामुळे लाखो भाविकांना अयोध्यावारीचा लाभ घेता येणार आहे.

ट्रेन नं ०७२२१ सिकंदराबाद-अयोध्याधाम सिकंदराबाद ही स्पेशल ट्रेन  २९ जानेवारीपासून दर एक दिवसाआड २९ फेब्रुवारीपर्यंत धावणार आहे. अर्थात महिनाभरात ती अयोध्याधामच्या १६ फेऱ्या करणार आहे. त्याच प्रमाणे परतीची गाडी १ फेब्रुवारीपासून दर एक दिवसाआड ३ मार्चपर्यंत धावणार असून ही गाडीसुद्धा १६ फेऱ्या लावणार आहे. ट्रेन नं. ०७२२३ काझीपेठ- अयोध्याधाम-काझीपेठ ही स्पेशल ट्रेन ३० जानेवारीपासून  २८ फेब्रुवारीपर्यंत दर एक दिवसाआड आणि परतीची गाडी २ फेब्रुवारीपासून  २ मार्चपर्यंत प्रत्येकी  १५-१५ अशा एकूण ३० फेऱ्या लावणार आहे. ट्रेन नंबर ७६४९ जालना- अयोध्याधाम – जालना ही विशेष रेल्वेगाडी ४ फेब्रुवारीला जाईल आणि ७ फेब्रुवारीला अयोध्याधाम मधून परत जालना येथे पोहचण्यासाठी  निघेल. ट्रेन नंबर ०७६३६ नांदेड-अयोध्याधाम-नांदेड १४ फेब्रुवारीला अयोध्याधामसाठी निघेल आणि १६ फेब्रुवारीला परतीच्या प्रवासाला प्रारंभ करेल. या शिवाय ०७२१५ गुंटूर -अयोध्याधाम- गुंटूर, ०७२१६ विजयवाडा- अयोध्याधाम – विजयवाडा, ०७२१७ राजाहमुंद्री अयोध्याधाम-राजाहमुंद्री आणि समलकोट- अयोध्याधाम -समलकोट या स्पेशल ट्रेनसुद्धा प्रवाशांना अयोध्याधामचे दर्शन घडविणार आहेत.

अयोध्येत भव्यदिव्य श्रीराम मंदीरात जाऊन रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी देश- विदेशातील कोट्यवधी भाविक उत्सुक आहेत, हे पाहता केंद्र  आणि राज्य सरकार भाविकांसाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करण्यावर भर देत आहे.  रेल्वे बोर्डानेही अधिकच्या ट्रेन सोडण्याचे नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेनेही वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल ९ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. ७ गाड्या आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा येथून तर दोन स्पेशल ट्रेन मराठवाड्यातील जालना आणि नांदेड येथून धावणार आहेत.