आयोध्या येथील प्रभू श्रीरामलल्लाच्या प्रतिष्ठापना पर्व
राम ही दोन अक्षरे जरी उच्चारले तरी मनाला शांतता, प्रसन्नता, उर्जा मिळते – डाॅ.प्रा.श्याम महाराज नेरकर
बीड /परळी वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क –
राम हा शब्द दोन अक्षरी असून ही दोन अक्षरे जरी उच्चारले तरी मनाला शांतता, प्रसन्नता व ऊर्जा प्राप्त होते. रामरक्षा स्तोत्र हे त्या प्रभू श्रीरामांनी आपल्या सर्वांचे संरक्षण करावे अशा प्रकारचे कवट आहे. त्यामुळे रामरक्षेची नित्य उपासना ही आपल्याला प्रभू रामाशी एकरूपता प्रदान करते असे प्रतिपादन ह भ प डॉ.प्रा. श्याम महाराज नेरकर यांनी परळीच्या काळाराम मंदिरात व्याख्यानात बोलताना केले.
आयोध्या येथील प्रभू श्रीरामलल्लाच्या प्रतिष्ठापना पर्वाच्या अनुषंगाने परळीतील पुरातन अशा काळाराम मंदिरात धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नित्य नित्य पूजा ,अभिषेक रामरक्षा स्तोत्र सामूहिक पठण, मारुतीस्तोत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. यावेळी हनुमान चालीसा पठणही करण्यात आले. त्यानंतर ह भ प डॉ. प्रा.श्याम महाराज नेरकर यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानात बोलताना डॉ.प्रा. शाम नेरकर यांनी रामनामाचे महत्व विशद करून रामरक्षे विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, राम हे दोन अक्षरेही उच्चारले तरी मनाला शांतता, प्रसन्नता, उर्जा, उत्साह, समाधान मिळते. त्यामुळे रामरायाने आपल्या सर्वांचे रक्षण करावे, यासाठी बुधकौशिक ऋषी यांनी जी रचना केली आहे. ती म्हणजे रामरक्षा. रामरक्षा हे स्तोत्र आहे. स्तोत्र म्हणजे ज्यामध्ये स्तुती केली जाते ते स्तोत्र होय. राम रक्षा नित्य उपासनेने मन स्वास्थ्य प्राप्त होते. त्याचबरोबर एक प्रकारे रामाचे कवच म्हणून ही उपासना आपल्याला मदत करत असते .यासाठी रामरक्षाची नित्य उपासना करावी असे त्यांनी सांगितले.
अयोध्येत श्रीराम मंदिरात रामप्रभुंचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना या पावनपर्वाच्या अनुषंगाने परळीच्या काळाराम मंदिरात व्याख्यान व धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या अनुषंगाने उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली होती. विद्युत रोषणाई, पुष्प सजावट, रांगोळ्या, महाप्रसाद उत्साहात करण्यात आले. श्री काळाराम मंदिर संस्थान, स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह, अंबेवेस, परळी वैजनाथ, जि.बीड. येथे ‘एक दिवस श्रीरामासाठी.. रामरक्षा देशासाठी’ या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ. श्याम महाराज नेरकर यांचे व्याख्यान झाले. अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपणाचे सामूहिक दर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात भाविकभक्त ,धर्मप्रेमी ,नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.