नराचा नारायण होणं उत्क्रांतीचा सर्वोच्च बिंदू

स्व.श्यामरावजी देशमुख स्मृतिसमारोहात प्रा.डॉ. विश्वाधार देशमुख यांचे प्रतिपादन

बीड/परळी-वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क-  येथील महिला महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होत असलेल्या स्व. श्यामरावजी देशमुख स्मृति समारोहाच्या दुसऱ्या दिवसाचे पुष्प प्रा. डॉ.विश्वाधार देशमुख यांनी गुंफले .
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा संजयजी देशमुख तर प्रमुख उपस्थिती म्हणून सचिव मा रवींद्र देशमुख व प्रा प्रसाद देशमुख संस्थेच्या संचालिका सौ. छायाताई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . विद्याताई देशपांडे यांची उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे कोषाध्यक्ष मा. प्रा. प्रसाद देशमुख सर यांनी केले. संतांनी माणसाला जगण्याचा आदर्श देऊन माणसांत त्या ईश्वरी तत्वाला पहा असे सांगून त्यांनी माऊली शब्दाचा यथार्थ अर्थ तिच्या ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ या वाक्यात आहे असे प्रतिपादन केले.
आपले अध्यक्षीय मनोगत मांडताना मा.रवींद्र देशमुख यांनी या संस्थेची उभारणी ही मुलींच्या शिक्षणाचा वसा घेऊन स्व. श्यामरावजी देशमुख यांनी केल्याचे प्रतिपादन केले.या वक्तव्यात संस्थेच्या प्रगतीचा धावता आढावा घेतला.


भूतां परस्परे पडो मैत्र जीवाचे या वचनाला आधारस्तंभ मानून त्यांनी त्यांचे विचारपुष्प गुंफले. प्राधान्याने मैत्री – एक हृदयाची भाषा असते ती मानवाची अत्यंत महत्वाची गरज आहे , याविषयी त्यांनी सविस्तर भाष्य केले. अग्नीचा शोध ही मानवाची उत्क्रांती आहे . नराचा नारायण होणं हा उत्क्रांतीचा सर्वोच्च बिंदू आहे . एकाकीपणा टाकून देऊन संवाद – सुसंवादक्षम व्हावे ,यानेच जीवन उत्सव होईल . सध्या पदव्या स्वस्त व शहाणपण महाग झाले. काळजाच्या खोलीकडे येण्याचा मैत्री हाच मार्ग आहे . नवऱ्याला बायकोत व बायकोला नवऱ्यात प्रवेश करता आला पाहिजे हा विषय महात्मा फुले व सावित्री बाई फुले या दाम्पत्याच्या जीवनाच्या आधारे प्रतिपादन केला . सहिष्णुता व संवेदनशीलता यांची बेरीज म्हणजे भारतीय समाज आहे असे त्यांनी प्रतिपादन केले .
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालक मंडळापैकी मा. हेमंतजी कुलकर्णी, मा.मनोहरराव जी कांबळे व सौ. विद्याताई देशमुख ,सौ स्नेहाताई देशमुख तसेच परळी मधील अनेक मान्यवर व पत्रकार उपस्थित होते .या व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर निबंध स्पर्धेतील पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला .
या सायंकालीन सत्राचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अरुण चव्हाण व प्रा.डॉ.कल्याणकर मॅडम यांनी केले . तर प्रा. प्रवीण नव्हाडे यांनी आभार मानले .या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले .