◾हळदी कुंकू लावून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंचे पुस्तक भेट देत केला विधवा महिलांचा सन्मान!
बीड/परळी-वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क– महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परळी शाखेच्या वतीने आज दि24/01/2024, बुधवार रोजी येथील मिलिंद कनिष्ठ महाविद्यालय येथे विधवा व परितक्ता महिलांसाठी एक आगळा वेगळा हळदीकुंकू समारंभ व तिळगूळ असा अनोखा कार्यकम घेण्यात आला. तसेच उपस्थित महिलांना समतेची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार तथा अंनिसच्या जिल्हा प्रधान सचिव सुकेशनी नाईकवाडे या उपस्थित होत्या. तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य राठोड सर , तर मार्गदर्शक म्हणून प्रजावती कांबळे, अनिता रोडे, सुनिता नरंगलकर इ मंचावर उपस्थिती होत्या.
सर्व उपस्थित वक्त्यांनी विधवा, परितक्ता महिलांना धार्मिक व सामाजिक जीवन प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे व त्यामुळे च आजच्या काळात विधवा प्रथा बंद करून कायदा पाळण्याचे आवाहन करण्यात आले सर्व विधवा व परितक्ता महिलांना सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर , राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवन चरित्र भेट देण्यात आली व त्यांना तिळगुळ भरवून त्यांना हाळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी उपस्थित सर्व महिलां व पुरुषांनी टाळ्याचा गडगडाट केला
यावेळी अनेक महिलांनी सावित्रीबाई फुले यांचेवर गीतं गाईली तर नाटककार प्रा. तायडेसर यांनी सुंदर कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विलास रोडे यांनी केले तर आभार अंनिस परळी शाखेचे कार्याध्यक्ष रानबा गायकवाड यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंनिस चे विकास वाघमारे, अशोक मुंडे, नवनाथ दाणे, अरुण जाधव, दिपक सिरसाट, महादू अजले, प्रा एस व्ही जाधव, विठ्ठल झिलमेवाड दादा आदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.