कुणबी- मराठा आरक्षणाच्या लढ्याला यशपरळी शहर व तालुक्यात ठीक ठिकाणी जल्लोष

परळी वैजनाथ /मराठा आरक्षण लढा-

बीड/परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क :- मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक महिन्यापासून कुणबी मराठा आरक्षणाचा लढा सुरू होता. संपूर्ण महाराष्ट्रात गाव-खेड्यात, वस्ती- वाड्यात या आंदोलनाचे लोण पसरले होते. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासह अन्य मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे 26 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरू केले होते. मराठा आरक्षणाच्या संदर्भात शिंदे सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. सरकारच्या या निर्णयाचे परळी शहर व तालुक्यात तमाम मराठा समाज बहुजन बांधवांनी फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे मराठा समाज बांधवांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष केला तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून या ठिकाणी फटाक्याची आतिश बाजी तसेच गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख वैजनाथ माने, रमेश भोईटे, भाजपा किसान मोर्चाचे कॉ.उत्तम माने, माऊली गिराम, अंगद गिराम, सुजयसिंह माने, स्वप्निल सुरवसे, सिद्धेश्वर रेवले, दिनेश भोसले, अरुण माने, आदिसह असंख्य मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. परळी शहर व तालुक्यातील सिरसाळा, पिंपळगाव गाढे, धर्मापुरी, कनेरवाडी, नागपूर आदी सर्कल मधील गावागावात समस्त मराठा समाज बांधवांनी फटाके फोडून व गुलाल उधळून शिंदे सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत एकच जल्लोष केला होता.