धारगड यात्रा

🔷 पर्यटन/ निसर्ग यात्रा/ भ्रमंती

एकूणच शहरी जीवनमानात सर्वांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे शहरातील गर्दी, गोगाटा, गाड्यांचे हॉर्न ,धुळ आणि प्रदूषण यातून मोकळा श्वास घेण्यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो पण प्रत्येक जण वेळेचीच अडचण सांगतो. अनेक जण नित्यनेमाने आणि सातत्याने निसर्ग पर्यटन करत असतात. निसर्गाच्या सानिध्यात राहून पुनश्च ऊर्जा दायी होण्यासाठी निसर्ग पर्यटन आवश्यकच असतं. सतत हिरव्या कंच निसर्गाच्या सानिध्यात फिरणारी आणि सातत्याने नवनवीन ठिकाणांना भेटी देणारी माझ्या मित्र परिवारातील के नमिता प्रशांत कलावंत जोडी.

के नमिता प्रशांत यांच्या काही सफरीची ची माहिती यापूर्वी आपण वाचलीच आहे. आता दर रविवारी नमिता प्रशांत यांच्या सुखद नयनरम्य, छायाचित्रे आणि सफरणामा व लेखाजोखा आपण महाराष्ट्र न्यूज कनेक्ट या वेबवर ही वाचू शकाल त्या सोबतच उत्तमोत्तम निसर्ग छायाचित्राचा आनंदही तुम्हाला मिळेल तो निश्चितच तुम्हाला आवडेल.- संपादक

……………………………………………………………………………….

🔷 पर्यटन/ निसर्ग सौंदर्य/चिखलदरा/ मेळघाट-

🔷 “धारगड यात्रा“🌿🌿💚
परवा रविवारी, आमच्या विदर्भातील प्रसिद्ध धारगड यात्रेला जाण्याचा योग आला होता. खुप वर्षांपासून इच्छा होती मात्र गर्दी म्हटलं, की अंगावर काटा येतो. त्यातल्या त्यात जंगल म्हटलं की निव्वळ हिरवीकंचं गर्दसावली अंगावर घ्यायची असते अन तिथे फक्त नि फक्त शांतीची अपेक्षा असते.🌿🌿

मित्रांनी आदल्या दिवशीच पहाटे लवकर येण्याच्या पूर्वसूचना दिलेल्या होत्या, त्यामुळे सगळं शांततेत पार पडलं.
चिखलदरा तालुक्यातील, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अति संरक्षित क्षेत्रात येणाऱ्या या प्रसिद्ध धारगड यात्रेला फक्त वर्षातून एकदाच म्हणजे श्रावणातील तिसऱ्या श्रावण सोमवारीच जाता येऊ शकतं. वनविभागाकडून केवळ दोन दिवसांची परवानगी मिळत असल्याने हजारो भाविकांची एकाचवेळी प्रचंड गर्दी येथे पाहायला मिळते. अतिसंरक्षित क्षेत्रात येत असल्याने कच्चे व अरुंद रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी हतबल करणारी असते. जवळपास तीन हजार फुट उंचावर, गर्द निसर्गाच्या सानिध्यात, सातपुड्याच्या गगनभेदी, अक्रळविक्राळ पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे मंदिर आहे. येथे उंचावरून कोसळणारा धबधबा भाविकांना जलभिषेक करीत असतो मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने भक्तांना तुषारस्नान घडले. नियोजित वेळ असल्याने येथे रात्रभर भाविकांची येजा सुरु असते. काही भाविक तर पायीपायी पाऊलवाटेने येत असतात. एवढी गर्दी असते की, पोलीसताफा व वनविभागातील उच्च अधिकारीदेखील या दोन दिवसांत डोळयांत तेल घालून परिस्थितीचा आढावा घेत राहतात कारण त्यांना भाविकांची काळजी असतेच सोबतच बेजबाबदार भक्तांमुळे होणाऱ्या त्रासापासून वन्यप्राण्यांचे तसेंच निसर्गाचे संरक्षण करण्याचीही महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते.

आमचे काही निसर्गमित्र केवळ स्वच्छता करण्याकरिता दोन दिवसांचा वेळ काढून आवर्जून तेथे उपस्थित असतात… या यात्रेदरम्यान दोन दिवसांअगोदरचा आणि नंतरचा परिसर यांत भयंकर तफावत असते. त्यामुळे मी येथे मुळीच म्हणणार नाही, की तुम्ही नक्की जा. खरंतर यात्रेनिमित्ताने या दोन दिवसांत अतिसंरक्षित क्षेत्र काय असतं हे अनुभवता येऊ शकतं मात्र हा आनंद केवळ सच्चे निसर्गप्रेमी आणि जबाबदार नागरिकच अनुभवू शकतात. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं, आपण कुठल्या प्रकारात मोडतो…येथे कचरा, घाण करणाऱ्या, धिंगाणा घालणाऱ्या बेजबाबदार लोकांनी मुळीच जाऊ नये. त्यांना महादेव तर नक्कीच नाही मात्र वाघोबाचा गोड प्रसाद नक्कीच भेटू शकतो.

वनविभागाने आपली चोख सुरक्षाव्यवस्था बजावली आहे म्हणून गाफिल राहू नये, तर आपण स्वतःही दिलेल्या सूचनांचं योग्य पालन करून खबरदारी घेणे गरजेचे असते.. मात्र असं होत नाही.तेथे गेल्यावर माणसाचं शहाणपण पाण्यात वाहून जातं… असो 🙏😊

(लक्षात ठेवा… धारगड यात्रा श्रावणातील फक्त तिसऱ्या श्रावण सोमवारीच असते आणि त्याकरिता वनविभागाकडून रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून ते सोमवारी दुपारी तीन एवढीच वेळ नियोजित केलेली असते.. या दोन दिवसांव्यतिरिक्त वर्षभरात इतर दिवशी तुम्ही येथे जाऊ शकत नाही.)

नमिताप्रशांत.