सिरसाळा ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता व ओपन पेस मधील अतिक्रमण हटवा- उत्तम माने

🔷  मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन-

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – सिरसाळा ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक एक मधील रस्ता व ओपन पेस मध्ये असलेली अनाधिकृत अतिक्रमणे तात्काळ काढावीत या मागणीसाठी सोमवार दि. 12 फेब्रुवारी 2024 पासून परळी पंचायत समिती कार्यालासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनावर राहील. असा इशाराही भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव उत्तम माने यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव उत्तम माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2018 पासून सिरसाळा येथील गट क्र.01 या ठिकाणी होत असलेल्या अतिक्रमण बाबत ग्रामविकास ग्रा.प. सिरसाळा, गटविकास अधिकारी प.स परळी वै.,उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा.प) जि.प.बीड यांना रस्ता व ओपन स्पेस मध्ये होत असलेल्या अतिक्रमण बाबत वेळोवेळी कळविण्यात आले आहे. परंतु ग्रामविकास अधिकारी ग्रा.प. सिरसाळा जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. कायदेशीर रित्या आतापर्यंत अनेक वेळा निवेदने देऊनही कसलीही कारवाही अद्याप पर्यंत झालेली नाही.

दि. 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत ग्रामपंचायत अधिनियम कायद्याप्रमाणे अतिक्रमण करून बांधण्यात आलेली बांधकामे पाडून ओपन स्पेस व रस्ता खुला करावा. अन्यथा दि. 12 फेब्रुवारी 2024 पासून पंचायत समिती कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सदरील आंदोलनास बसल्यास कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास सर्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील असेही या निवेदनात माने यांनी म्हटले आहे.