“धारखोरा” खोऱ्यातलं स्वप्न

निसर्ग /दर्या खोऱ्या  
     जितकं निसर्गाच्या जवळ जावं तेवढा माणूस “माणूस” बनत जातो… एवढी ताकद निसर्गात आहे. कुठलंच झाड, फुल, फळ,पान, नदी, झरे, दगड, माती, पक्षी, समुद्र, आकाश, हवा कधीच कुणाला लिंग,जात, धर्म विचारत नाही. सगळ्यांना फक्त देत राहतात नि देत राहतात… कुणालाच कमी नाही, कुणालाच जास्त नाही… झाड कधीच ठरवत नाही, त्याच्या सावलीत कुणी बसावं… फुल फळ ठरवत नाहीत त्याला कुणी खावं.. हवा ठरवत नाही, ऑक्सिजन कुणी घ्यावं.. नदी ठरवत नाही, पाणी कुणी प्यावं.. मग…. आपण का ठरवतो??????
नसर्गासमोर आपण अत्यंत खुजे आहोत… विसरू नये कुणीच… ” जो बना सकता हैं, बिगाड भी सकता हैं ” ही या सहलीत आमच्या लेकरांना उमजलेली गोष्ट.. आशा करते,आपल्या सगळ्यांनाच समजावी.
आमच्या मेळघाटात असंख्य धबधबे आहेत. त्यातील धारखोरा धबधबा सर्वात उंच, तीन टप्प्यात पडणारा लोकप्रिय धबधबा आहे.
हा धबधबा महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येणारा, अतिशय घनदाट हिरव्याकंच निसर्गात लपून असलेला एक सुंदर, मंत्रमुग्ध करणारा धबधबा आहे. परतवाड्यावरून जवळपास पंधरा किलोमीटरवर बुऱ्हाणपूर (म.प्र.)या गावातून आत जाऊन सुसर्दा या गावानजीक गाडी पार्क करावी लागते आणि त्यानंतर पायीपायी दाट जंगलातून जवळपास अडीच तीन किलोमीटर आत जावे लागते, दाट जंगलात असल्याने एकटं दुकटं जाऊ नये, कारण जंगल हे वन्यप्राण्यांचं घर असतं.. आपण पाहुण्यासारखं जावं…पाहुण्यांसारखच शहाण्यासारखं वागावं नी पाहुण्यासारखं परत यावं. आणि आपला कचरा आपल्यासोबतच परत आणावा. निसर्गरम्य ठिकाणी घाण करू नये. असो…
या भागातून वाहणारी ‘बिछन’ नदी धारखोरा धबधब्याच्या खळखळ कोसळणाऱ्या पाण्यातून प्रवाहीत होते आणि नंतर चंद्रभागा नदीत विलीन होते. खडबडीत दगडांवरून धोधो वाहत्या प्रवाहामुळे नयनरम्य असं विलक्षण चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. निसर्ग प्रेमी, साहसीमंडळी आणि मेळघाटच्या नैसर्गिक समृद्धतेत शांतता शोधणाऱ्यांसाठी हे एक लोकप्रिय स्थळ आहे. सुट्टीच्या दिवशी टाळून इतर दिवशी गेलात तर निसर्गाच्या शांततेचाही आनंद घेऊ शकाल.
निसर्गाचा निखळ आनंद अनुभवण्यासाठी सुरक्षिततेची खबरदारी घेणे, स्थानिक नियम आणि निसर्गनियमांचे पालन करणे आणि पर्यावरणाचा आदर करणे महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा. धबधबा म्हंटलं की सगळे शुभ्र, थंडगार पाण्याच्या प्रवाहाखाली बेफाम होऊन जातात. मस्तीमस्तीत कुठलेच भान रहात नाही. मात्र अशाठिकाणी सतत प्रवाहाचा अंदाज घेत राहणे गरजेचे असते. बरेचदा हवेच्या दाबामुळे खाली कोसळणारे पाणी हेलकावे घेत असतं त्यामुळे प्रवाह कमी अधिक जाणवत राहतो. तरीसुद्धा, कोसळणाऱ्या पाण्यातून खडे, माती अंगावर येतेय का? पाणी गढूळ होतंय का? पाण्याचा प्रवाह वेगाने वाढतोय का?…इत्यादी गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिल्यास, पूर तसेंच दरड कोसळणे अशा अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण होऊ शकते. अशाठिकाणी “सावधानताही समझदारी हैं ” हे लक्षात ठेवावं आणि निसर्गसंगतीतला अद्भुत प्रवास संस्मरणीय करावा….
नमिताप्रशांत.