शेतकरी अपघात विमा
मुंबई (दि. 20) – स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतर केल्यानंतर प्रथमच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून या योजनेतील लाभार्थींना वितरित करण्यासाठी 23 कोटी 37 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पूर्वी सदर योजना ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना या नावाने ओळखली जायची व या अंतर्गत विमा सुरक्षा म्हणून अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना अपघातातील उपचारासाठी किंवा मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य म्हणून ठराविक रक्कम देण्यात येत होती, मात्र धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळात या योजनेचे विमा योजनेतून सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतरण करण्यात आले.
यादरम्यानच्या खंडित कालावधीतील अपघात ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून तब्बल 49 कोटी रुपये इतक्या लाभाचे वितरण करण्यात आले होते. त्यांनंतर आता योजना नव्या रूपाने सुरू झाल्यापासूनच्या काळातील प्रलंबित प्रकरणे निकाली लावून त्यांच्या कुटुंबियांना लाभाचे वितरण करण्यासाठी 23 कोटी 37 लाख इतका निधी आज उपलब्ध करुन देण्यात आलाय.
जनता दरबारातील निवेदन अन मुंडेंनी राज्यातील शेतकऱ्यांना दिला लाभ!
दरम्यान सदर योजनेतील खंडित कालावधीत अपघात होऊन मृत्यू पावलेल्या परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची परळी येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात जनता दरबार उपक्रमांतर्गत भेट घेऊन निधी अभावी लाभ मिळाला नसल्याबाबत विनंती केली होती. त्यांनंतर धनंजय मुंडे यांनी या योजनेचा संपूर्ण आढावा घेऊन खंडित कालावधीतील राज्यातील सर्व प्रकरणे निकाली काढत त्यासाठी 49 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर बदललेल्या योजनेतील 23 कोटी रुपये अनुदान देखील उपलब्ध करून दिले आहे!