🔷 शिवजयंती वैचारिक उस्तव
बीड/परळी-वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क:- छत्रपतींचा चुकीचा इतिहास महाराष्ट्रामध्ये पेरला गेला. रयतेच्या राज्याच्या कल्याणासाठी जो कोणी आडवा येईल त्याला आडवं करण्याच काम महाराजांनी केलं.तिथे त्यांनी त्याची जात पाहिली नाही. शिवरायांनी किल्ल्याबरोबरच रयतेच मनही जिंकलं होत. किल्ला गेला तरी चालेल पण मावळा गेला नाही पाहिजे. हे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. आज महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेण्याची गरज आहे. नाचणारी पिढी जोपर्यंत वाचणारी होत नाही तोपर्यंत देशाचं कल्याण होत नाही असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रदीप सोळंके यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती दिनानिमित्त सोमवार दि १९ फेब्रुवारी २०२४ रोजी थर्मल पॉवर स्टेशन येथे प्रसिद्ध शिव व्याख्याते प्रदीपजी साळुंके यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी थर्मल पॉवर स्टेशन येथील खुले रंगमंच या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व्यख्यानास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी विचार पिठावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रदीप सोळंके, उपमुख्य अभियंता अमित बनकर, प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, अधीक्षक अभियंता धनंजय कोकाटे, एस.एम.बुक्तारे अधिक्षक अभियंता,
रोहीदास आव्हाड अधिक्षक अभियंता,
बी.एम.सिरसाट शाखा अध्यक्ष म.से.सं शक्तिकुंज वसाहत, बालाजी बोंडगे अध्यक्ष सार्वजनिक शिवजंयती उत्सव समिती, अंकुश जाधव ता.अध्यक्ष म.से.सं परळी.वै, संदिप काळे शहर अध्यक्ष म.से.सं परळी, चेतन रणदिवे, संदिप कुंदे सचिव सार्वजनिक शिवजंयती उत्सव समिती आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर प्रकाश टाकत सध्य स्थितीत महाराजांचे विचार ,आचार,कसे महत्वाचे आहेत हे आपल्या व्याख्यानातून सांगताना सोळंके म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांच्या आणि कुशल नियोजनाच्या जोरावर कधीही आपले राज्य आपल्या हातातून जाऊ दिले नाही. शिवयांच्या राज्यात स्त्रियांचा आदर होता. बलात्कार करणारांना ते आपल्या सैन्यातील सरदार असले तरी त्यांना शिक्षा करताना त्यांनी कोणाचीही गय केली नाही. शत्रू पक्षांच्या स्त्रिया सुद्धा महाराजांच्या राज्यात सुरक्षित होत्या. आजच्या राज्यकर्त्यांनी हि गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मोगलांकडे अफाट सैन्य आणि पैसा असला तरी महाराजांकडे त्यांच्या जीवाला जीव देणारे निष्ठावंत मावळे होते. जे स्वराज्यासाठी लढतील ते सर्व मराठे अशी त्यांची व्याख्या होती. त्यांच्या सैन्यात अठरा पगड जातींच्या मावळयाचा समावेश होता. असेही यावेळी शिवव्याख्याते प्रदीप साळुंके म्हणाले.
……………………………………………………………
🔷 वरून राजेशाही आतून लोकशाही
औरंगजेब आणि सगळी मोगलाई स्वतःच्या साम्राज्य विस्तारासाठी साठी लढत होते तर शिवराय रयतेच्या राज्यासाठी लढत होते. छत्रपती शिवराय हे लोककल्याणकारी राजे होते. जगातील राज्यकर्ते, जनता शिवरायांना आदर्श राजा मानतात. शिवरायांनी जनहीताचे घेतलेले निर्णय पाहता शिवाजी महाराजांचे राज्य हे वरून राजेशाही आणि आतून लोकशाही असलेले जनतेचे राज्य होते. शिवकाळात सर्व जनता गुण्यागोविंदाने राहत होती.