पंकजाताई मुंडे यांनी घेतला परळी मतदारसंघातील बुथ यंत्रणेचा आढावा

🔷 मला मजबुरीने नको तर मजबुतीने काम हवंय ; प्रत्येकाने आपलं बुथ अधिक सक्षम करावं

🔷 तुमची साथ अन् आशीर्वाद असेल कुठल्याही संकटाला सामोरे जाईल

बीड/ परळी वैजनाथ।दि. २३।– पाच वर्षे अडचणीचे दिवस पाहिले. पुढे काय? माहित नाही. आता जी निवडणूक येईल त्यात उमेदवार कोणीही असेल पण मला तुमची साथ आणि आशीर्वाद पाहिजे. मला तुमच्याकडून मजुबरीचं नको तर मजबुतीचं राजकारण हवंय. आपल्याला कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. सकारात्मकतेनं काम करून प्रत्येक बुथ अधिक सक्षम कसं होईल यावर लक्ष केंद्रित करून काम करा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केलं.

परळी मतदारसंघातील बुथ यंत्रणेचा पंकजाताई मुंडे यांनी आज अक्षता मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, लोकनेते मुंडे साहेबांसारखा उमदा नेता आपण घडवला. सोशल इंजिनिअरिंग करण्यात ते माह्टर होते. अडचणीच्या काळात मी त्यांचा आधार बनून काम केलं. त्यांच्या पश्चात प्रतिकुल राजकीय परिस्थिती असताना देखील प्रीतमताईंना आपण निवडून आणलं. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत नसतानाही आपण लढलो आणि जिंकलो. पण राष्ट्रवादी आज आपल्यासोबत सत्तेत आहे, त्यामुळे मताधिक्य वाढले तरच त्यांच्या सोबत असण्याचा परिणाम दिसेल असं त्या म्हणाल्या.

🔸संपर्कासह सकारात्मक काम करा

मंत्री असतांना मी मतदारसंघातील गावागावात न मागता मोठया प्रमाणात निधी दिला, भेदभाव केला नाही पण आता परिस्थिती थोडी वेगळी आहे. कुणाला काम मिळाली असतील, नसतील त्याबद्दल आता चर्चा करू नका. आजपासून फक्त ४५ दिवस राहिले आहेत, आपले सगळे वैयक्तिक कामं, प्रश्न थोडं बाजूला ठेवा आणि एकजीव होऊन सकारात्मक पध्दतीने काम करा. प्रत्येक बुथ मजबुत करा. तुमची साथ आणि आशीर्वाद असेल तर कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची माझी ताकद आहे असं सांगत पंकजाताईंनी स्वाभिमानी आणि मजबुत राजकारण करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.

बैठकीचे प्रास्ताविक भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते राजेश देशमुख,  अच्युत गंगणे यांनी बुथ रचनेबद्दल माहिती दिली. याप्रसंगी सुपर वाॅरिअर्स संयोजक अनिल काळे, विस्तारक दयावान मुंडे, बाबासाहेब आगे, ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे, दत्ताप्पा इटके, विकासराव डुबे,रमेश कराड, शांतीलाल जैन, शामराव आपेट, उत्तम माने, नीळकंठ चाटे, श्रीराम मुंडे, दिलीप बिडगर, संजय गिराम, अविनाश मोरे, राजेश्वर देशमुख आदींसह बुथ प्रमुख, शक्तीप्रमुख, वाॅरिअर्ससह प्रमुख कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
••••