उन्हाळी ट्रेक….नर्नाळा किल्ला…

सैर… गड किल्ले / उन्हाळी पर्यटन /उन्हाळी ट्रेक….नर्नाळा किल्ला…
स्वतःची तब्येत आणि स्टॅमिना दोन्ही चाचपून पाहावयाचे असतील तर कमीतकमी वर्षातून उन्हाळी, पावसाळी, हिवाळी हे तीन ट्रेक तरी जरूर करायला हवेत. हिवाळा फिरस्तीच्या दृष्टीने उत्तम असला तरी हिवाळ्यात वारा, पावसाळ्यात पाणी आणि उन्हाळ्यात ऊन या महाभूतांना सामोरं जावं लागतं. अक्षरशः झुंजावंच लागतं. बाकीचे दोन भुतं अवकाश आणि जमिन आपल्या आधाराला असतात. आपल्याला धरून असतात हे खरं…
आमच्यासारखे फिरस्ती पाखरं सतत निसर्गात उडतच असतात, आम्हाला वेळ मिळतो, कारण आम्ही लग्नसमारंभ, वाढदिवसं, मुंज, बारसे, ओवळेसोहळे यापेक्षा निसर्गात रमणं पसंद केलं… निवडलं. परंतू बहुतेकांना हे शक्य नसतं आणि न पटणारंही. तरीही आरोग्याच्या दृष्टीने निसर्गभ्रमंती फार गरजेची असते. निसर्ग आपल्याला पावलोपावली स्वतःला तपासून पाहण्याची संधी प्रदान करीत असतो. तुम्ही किती शहाणे आहात, परिपूर्ण आहात, सुदृढ आहात, सक्षम आहात, माणुसकीचे आहात. हे सर्व सर्व तुम्हांला घशाला कोरड पडली अन जीवाची घालमेल होऊ लागली की लक्षात यायला लागतं. ट्रेकिंगच्या दरम्यान श्वासांची जी झुंज सुरु होतें, अंतर्गत विचारांची धावपळ आणि स्वतःशी प्रामाणिकपणे होऊ घातलेलं चिंतन…खरोखर जीवनात बदल घडवीणारं असतं.
ट्रेकिंग म्हणजे निसर्गानं सुचवलेलं रेग्युलर चेकअपच असतं. तुम्हांला सतत नियंत्रित ठेवणारं. असो…
काल ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्प’ ला पन्नास वर्षं पुर्ण झाल्याच्या निमित्ताने वनविभागाच्या वतीने आयोजित नर्नाळा ट्रेक करून आलो. साधारण तीस जण या ट्रेकला सहभागी झाले होतें. मात्र पहिल्याच चढाईला सगळे फितूर झालेत, हापायला लागलेत आणि ट्रेक अर्ध्यावरच संपुष्टात आला. अवघ्या आठकिलोमीटर मध्येच सगळ्यांची दमछाक झाली आणि आमचा हिरमोड. ट्रेकर्स एवढे थकलेत की, वनविभागाने परतीला सगळ्यांना सुखरूप परत आणण्याकरिता गाड्यांची (जीप्सी)व्यवस्था केली होती. मग काय, परतीला आम्ही दोघे मी आणि प्रशांत, मनीष, अंकुश, कुणाल, पाच वनगाईड आणि वनपाल प्रमोदभाऊ एवढेच. पण जेमतेम वेळ कां असेना मज्जा आली, खूप माहिती मिळाली…सकाळी आठला निघालेलो दुपारी बारा वाजेतोच शहानूरला परतलो.
नियोजक मनिष ढाकुलकर, रेंज ऑफिसर हर्षाली रिठे, वनपाल प्रमोद खांडवे दादा, सर्व वनविभागातील कर्मचारी आणि वनगाईड मित्र सर्वांचे मनःपूर्वक आभार…खूप छान आठवणींचा दिवस दिलात आपण सगळ्यांनी.. खूप छान व्यवस्था होती, सगळं नियोजनबद्ध होतं. नर्नाळा किल्ला अतिशय सुरेख असा दुर्गम गिरीदुर्ग आहे आणि रंजक देखील.. यावर पुन्हा कधी सविस्तर लिहिल.
मेळघाटवासीय सर्वांना सर्व कर्मचारी, सेवक, निसर्गप्रेमी सर्वांना “मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थापना दिनाच्या” हार्दिक शुभेच्छा…
– नमिताप्रशांत