जन्म देणाऱ्या कुटुंबाच्या शोधात “नेहा असांते”

नकोशी झाली तेवीस वर्षाची… शोध घेते आहे परळीत मातापित्यांचा

बीड /परळी वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क – २००२ वर्षी मंदिरात टाकून दिलेल्या नकोशा मुलीने आपल्या वयाची सुमारे 23 वर्ष गाठले आहेत. वैद्यनाथ मंदिरात एका टोपलीत तिला गाभाऱ्यात जवळ सोडून दिल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी तिला पोलिसांच्या स्वाधीन केलं. तिथून तिचा प्रवास सुरू झाला. पंढरपूर येथील अनाथालय, त्याच्यानंतर पुणे येथे तिचा प्रवास होऊन तिथून ती दत्तक म्हणून फ्रान्स या देशात गेली. आज ती फ्रान्समध्ये असून उच्चशिक्षित आहे. आपल्या मूळ जन्मदात्या ना भेटण्याची उमेद ह्रदयी घेऊन दत्तक माता पित्यासह ही नकोशी 24 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्याला सोडून दिलेल्या  जागी म्हणजेच वैद्यनाथ मंदिरापर्यंत पोहोचली. तिचीच ही कहाणी.

साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी स्त्रीभ्रूणहत्या साठी जिल्हा कुप्रसिद्ध झाला होता. अनेक नकोशा मुलींची गर्भातच हत्या झाली होती.  काही मुलींचा जन्म झाला पण तिचं पालन पोषण, शिक्षण, लग्नकार्य आपणास झेपणार नाही ही प्राथमिक भावना लक्षात घेतली तर मुलींना टाकून देण्यात येत होतं. दुसऱ्या बाजूस विवाहपूर्व संबंधातून जन्मास आलेली नकोशी मुळे आपली समाजात बदनामी होईल किंवा इतर अनेक कारणामुळे मुलींना टाकून देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले होतं आणि आजही आहे. गत डिसेंबर जानेवारी महिन्यात शहरात वेगवेगळ्या भागात दोन नकोशी मुलींना टाकून दिल्याच्या घटना ताज्या आहेत. समाजातील अशांनी जन्मलेल्या मुली पासून सुटका करण्यासाठी तिला कुठेतरी टाकून देण्याचा मार्ग निवडलेला असतो.

दि. ८ जुन २००२ रोजी परळीच्या वैजनाथ मंदीरात टोपली मध्ये ठेवलेले लहानगे बाळ मंदीराच्या श्री खिस्ते यांना दिसले त्यांनी ते परळी पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथून हे बाळ नवरंगे बालकाश्रम पंढरपूर येथे दाखल करण्यात आले. तेथून ते बाळ २९ जुन २००२ रोजी प्रितमंदीर पुणे या संस्थेत दाखल करण्यात आले. तेथुन तिला गार्डियनशीप पेटिशन नं. १८६/२००३ अन्वये फ्रान्स मध्ये श्री व सौ असांते याना दत्तक देण्यात आले. हीच ती नेहल, आज नेहा बनून आपल्या दत्तक आई वडीलांसोबत परत भारतात आली आहे. आपल्याला कोणी वाचवले? आपले आई वडील कोण आहेत? हे शोधण्याची जबाबदारी तीने नेदरलँड मधील “अगेन्स्ट चाईल्ड ट्राफीकींगच्या” अरुण डोले यांच्या कडे सोपविली आणि त्यांनी पुण्यातील त्यांच्या सहकारी “अॅडॉप्टी राईट्स कौन्सिल” च्या अँडव्होकेट अंजली पवार यांना ही जबाबदारी नोव्हेंबर २०२० रोजी सोपविली.पुण्यातील अँडव्होकेट अंजली पवार यांनी नोव्हेंबर २०२० पासून शोधकार्यास सुरवात केली. आंबेजोगाईचे श्री. दगडूदादा लोमटे व परळी वैजनाथ चे श्री. बाळासाहेब देशमुख यांच्या मदतीने दि. ११/१२/२०२० रोजी श्री. विनायक खिस्ते  यांना शोधले व त्याच बरोबरपोलीस स्टेशनमधील रेकॉर्डस् देखिल शोधले.

नेहा ने शहरात आल्यावर ज्या विनायक खिस्ते यांनी जीवनदान दिले त्यांना पाहताच प्रथम भेटीत दोघांच्या भावना अनावर झाल्या व त्यांनी अश्रुना वाट मोकळी करून दिली. नंतर खिस्ते यांच्या परिवारा सोबत काही क्षण घालवले.
………………………………………………

नेहाच्या भावना 

आज नेहा आपल्या दत्तक आई वडीलांसोबत या सर्वांना ‘भेटण्यासाठी, आपण कुठे सापडलो ति जागा व मंदिर पाहण्यासाठी,त्याच बरोबर ज्यांनी तिला जन्म दिला आहे त्यांना शोधण्यासाठी आली आहे. तिला माहीत आहे की जेंव्हा तिच्या जन्मदात्यांनी तिला मंदिरामध्ये सोडले त्यावेळी त्यांची परीस्थिती चांगली नसावी किंवा मला सांभाळने त्यांना शक्य झाले नसावे. पण आज जर ते ही बातमी वाचत असतील किंवा पहात असतील तर त्यांनी, माझे आई वडील कोण आहेत हे ज्यांना माहीत आहे, त्यांनी अंजली पवार यांना ९८२२२०६४८५ या क्रमांकावर संपर्क करावा जेणेकरून ही माहीती गुप्त ठेऊन नेहा तिच्या आई वडिलांची किंवा नातेवाईकांची भेट घडवून आणता येईल. असे आव्हान नेहा असांते व तिच्या दत्तक आई वडिलांच्या वतीने अंजली पवार ह्याने केले आहे.