पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिसीव्दारे न्यू आष्टी- अमळनेर ट्रॅकलाईनचे उद्घाटन

बीड/आष्टी / एम एन सी न्यूज नेटवर्क – बीड जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आता मार्गी लागत चालला आहे. सुरूवातीला अ. नगर ते आष्टी दरम्यान रेल्वे सुरू झाली आहे. आता न्यू आष्टी-अंमळनेर (भां) नवीन (ट्रॅक) लाईन आणि अहमदनगर- न्यूआष्टी डेमू ट्रेनचे अंमळनेर (भां) रेल्वे स्टेशन पर्यंत होणारा विस्तार हि कामे रेल्वे विभागाच्या वतीने महत्वपूर्ण मानली जात होती. याचे उद्घाटन बुधवारी (दि.28) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. सर्व नागरिकांच्या सोयीचा विचार करता हा प्रकल्प महत्वपूर्ण आहे. शिवाय येणाऱ्या काळात आणखी मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण होईल असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. न्यू आष्टी ते अंमळनेर (भां) 33.92 किमी इतक्या अंतराचा नवीन ट्रॅक यावेळी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावेळी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे उपस्थित होते. या नवीन रेल्वे मार्गामुळे बीड जिल्हा रेल्वे कनेक्टिव्हिटीसह जोडला गेला आहे. याचा फायदा शेतकरी, विद्यार्थी, कामगार इत्यादी सर्वांना प्रवाशांना अहमदनगरला यायला व तेथुन पुणे-मुंबईला जाण्यासाठी सोय उपलब्ध होईल, तसेच शेतकऱ्यांना आपला माल कमी वेळेत आणि कमी खर्चात मोठ्या शहरात पोहचवता येईल, त्यामुळे शेती मालाचा दर्जा टिकून राहील. व याचा फायदा थेट शेतकऱ्याला मिळेल. तसेच विद्यार्थ्यांनाही आता अहमदनगर मार्गे पुणे, मुंबईला शिकण्याकरिता जाता येईल. कामगारांना कामासाठी मोठ्या शहरात रोजच जाता येईल.

…………………………………………………………………………………………

आजपासून सुरु होणार नियमित डेमू सेवा-शुभारंभानंतर, अहमदनगर ते अंमळनेर (भां) आणि अमळनेर (भां) ते अहमदनगर गाडी क्रमांक 01401/01402 या नियमित डेमू सेवा 29 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होतील. या गाड्या रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस चालवल्या जातील अशी माहिती सोलापूर मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

ट्रेन क्र.01401/01402 डेमू अहमदनगर-अमळनेर (भां)- अहमदनगर

ट्रेन क्र. 01401 अहमदनगर रेल्वे स्थानकावरून सकाळी 07.45 व. सुटेल आणि अमळनेर (भां) रेल्वे स्थानकावर 11.08 वा. पोहचेल आणि ट्रेन क्र. 01402 अमळनेर (भां) रेल्वे स्थानकावरून दुपारी 12.00 सुटणार आणि अहमदनगर रेल्वे स्थानकावर संध्याकाळी 03.55 वा. पोहचणार आहे. अंमळनेर (भां), हातोला, वेताळवाडी, न्यू आष्टी, कडा, न्यू धानोरा, सोलापूर वाडी, न्यू लोणी, नारायणडोह, अहमदनगर असे या मार्गावरील थांबे असतील.

…………………………………………………………………………………………

खा. मुंडेच्या प्रयत्नाना यश

गेल्या तीस वर्षांपासुन अ. नगर – बीड – परळी रेल्वे मार्गाचा प्रश्न रेंगाळलेला होता. परंतु स्व. गोपीनाथ मुंडे खा. झाल्यानंतर या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळाली. त्यांच्या निधनानंतर खा. प्रीतमताई मुंडे यांनी हा रेल्वे मार्गाच्या कामाचा नियमित पाठपुरावा केला. आणि निधी उपलब्ध करुन घेतला. हा रेल्वे मार्ग पुर्ण व्हावा या साठी अनेक आंदोलने झाली.