संकेश्वर नजीक पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस जळून खाक

बस अपघात/आग

🔷 पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस ला आग; प्रवाशांचे सामान जळून खाक

निपाणी – पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरी संकेश्वरलगतच्या सोलापूर गेटजवळ    पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे 5 च्या सुमारास एका खासगी प्रवाशी बसला भीषण आग लागली. त्यात प्रवाशांच्या सामानासह संपूर्ण बस भस्मसात झाली. पण सुदैवाने चालक व बसमधील  40 प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, शर्मा ट्रॅव्हलची खासगी बस मुंबईहून बंगळुरुला जात होती. ही बस पहाटे 5 च्या सुमारास संकेश्वर हद्दीतील सोलापूर गेटजवळ आली असता शॉर्ट सर्कीटमुळे अचानक बसला मागच्या बाजूने आग लागली. ही आग एवढी भीषण होती की अवघ्या 15 मिनिटांतच संपूर्ण बस भस्मसात झाली. बसचा चालक सिद्धाप्पा (वय 38) रा. बेळगाव कर्नाटक, यांनी प्रसंगावधान राखून क्लीनरच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.  दरम्यान या आगीत प्रवाशांना आपले सामान काढता आले नाही.प्रवाशांच्या बॅगा व इतर किंमती साहित्य बसमध्येच अडकून पडल्याने ते संपूर्ण जळून खाक झाले.