पुस्तकाचे मुखपृष्ठ वाचकांना आपल्याकडे आकर्षित करतात  : अच्युत पालव

🔸कला /कलावंत/ सुलेखन /चित्रकार :

मुंबई / ठाणे : वाचकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यात पुस्तकाच्या  मुखपृष्ठांचा मोठा वाटा असतो. एक प्रकारे मुखपृष्ठ त्या पुस्तकातिल कथाच उलगडून  सांगतात. चित्रपटाचे पोस्टर पाहून त्यात काय असेल, याचा अंदाज दर्शक लावतात. तद्वत पुस्तकाचे मुखपृष्ठाचे असते. त्यामुळे मुखपृष्ठ हा पुस्तकाचा आत्मा आहे, असे मत प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केले.

लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी अच्युत पालव यांच्याशी संवाद साधला. यावेळी  छोटेखानी मुलाखतीत पालव यांनी सुलेखनातील काही किस्से सांगितले. ते म्हणाले, ‘बहुपेढी विंदा’ या पुस्तकाचे कव्हर मीच करावे, अन्यथा त्या ठिकाणी काळा पेपर लावणार असे विजया मेहता यांनी स्पष्ट सांगितले होते. त्यावेळी एक डोळा काढून शेजारी हिरवे पान काढले. विजयाबाईंचा सकाळी ६ वाजताच फोन आला. कव्हर उत्तम झाले, असल्याचे त्यांनी सांगितले.

विजयाबाईंनी मर्ढेकरांवरील पुस्तकाचे कव्हर करण्यास सांगितले. मला मर्ढेकर वाचून समजलेच नाही. तेव्हा मला न समजलेले मर्ढेकर सांगण्यासाठी ‘म म म’ ने अर्धे पान भरून त्याखाली केवळ ‘मर्ढेकर’ लिहिले. जे कळले नाही ते मर्ढेकर मी मांडले, अशी आठवण अच्युत पालव यांनी यावेळी सांगितली.