
भगर खाल्ल्यामुळे विष बाधा
बीड/परळी-वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क- परळी मतदारसंघातील निरपणा या गावात एका सार्वजनिक कार्यक्रमात भगर खाल्ल्यामुळे सुमारे 18 लोकांना विषबाधा झाली झाली आहे यातील सर्वांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की अंबाजोगाई तालुक्यातील निरपणा येथे एका कार्यक्रमात भगर खाल्ल्यामुळे गावातील आणि मगरवाडी येथील सुमारे 18 जणांना उलटी आणि मळमळ चा त्रास सुरू झाला, त्यामुळे या सर्वांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार चालू आहेत, दरम्यान मतदार संघातील काहींनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क केला तेव्हा ते मुंबईचे कामकाज आटोपून परळी कडे महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनासाठी येत होते. त्यांनी तातडीने स्वामी रामानंद वैद्यकीय रुग्णालयात भेट देऊन विषबाधा झालेल्यांची चौकशी केली त्यांच्यावर तातडीने योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या. तसेच सदर रुग्णांना भगरीतून विषबाधा झाली असल्याने याबाबत योग्य चौकशी करण्याचेही निर्देश धनंजय मुंडे यांनी अन्न भेसळ व सुरक्षा अधिकारी श्री देवरे यांना दूरध्वनीवरून दिले.
यावेळी स्वारातीचे डीन डॉ.धपाटे, डॉ. मोगरेकर, डॉ.चव्हाण, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, तानाजी देशमुख, रणजित चाचा लोमटे, अजित गरड यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान आता सर्वच रुग्णांची प्रकृती आता स्थिर असून डॉक्टर योग्य ते उपचार करत असल्याचे अधिष्ठाता डॉ.मोगरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
…………………………………………………….
◾ भगरीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष
दरम्यान महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या नियोजनाच्या बैठकीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी भगर आणि भगरी पासून बनवलेले पदार्थापासून विषबाधा होऊ नये यासाठी भाविक भक्तांसाठी खाजगी संस्था, एनजीओ, राजकीय नेते, पक्ष यांच्याद्वारे दिल्या जाणाऱ्या मोफत प्रसादात भगर, आणि भगरी चे ईतर पदार्थ देण्यात येऊ नये तसेच अन्न आणि औषध प्रशासनातील अन्न तपासणीसानी या मोफत दिल्या जाणाऱ्या पदार्थाकडे लक्ष द्यावे अशी सूचना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिल्या होत्या, परंतू अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेचं निरपणा येथे झालेल्या घटनेतून दिसून येत आहे.

