खळबळजनक घटनाः
बीड /परळी-वैजनाथ –राज्य गुप्तचर विभागात (एसआयडी) कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा दोन तुकडे झालेला मृत देह परळी वैजनाथ रेल्वे स्थानका नजीक असलेल्या उड्डाणपूला जवळ रुळावर आज (दि ९ मार्च) रोजी सकाळी ७ च्या सुमारास आढळून आला. असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी परळी रेल्वेस्टेशन मास्तर यांनी आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये रेल्वेगाडीखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून असल्याची माहिती कळविली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. उड्डाणपूला जवळील रेल्वे रुळावर एका जणाचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला.
रेल्वे पोलीस चे एपीआय परमेश्वर सोगे यांनी दिलेले माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी बीड येथून बदली होऊन सध्या पुणे येथे एसआयडी ( राज्य गुप्तचर विभाग) विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांचा मृतदेह आज सकाळी परळी रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाणपूला खालील रेल्वेरुळावर आढळून आला. शुक्रवारी रात्रीनंतर पोलीस निरीक्षक दुधाळ हे रेल्वे गाडीखाली आले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
सदर मृत देहाची ओळख पटली असून पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांचा हा मृतदेह आहे.
मृत सुभाष दुधाळ हे मूळचे रा. अंकले ता. जत, जिल्हा सांगली येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. वर्ष 2009 -10 मध्ये एमपीएससी परीक्षेद्वारे त्यांची निवड झाली होती. जत तालुक्यातील अंकले गावचे ते पहिले एमपीएससीतून पीएसआय झाले होते. त्यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले आहेत.
दरम्यान ही आत्महत्या आहे की संशयास्पद मृत्यू याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही.मात्र या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या चिठ्ठीच्या अनुषंगानेच या मृत्यू मागचे कारण समोर येणार असल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि या घटनेचा तपास करणारे परमेश्वर सोगे यांनी दिली आहे.
…………………………
गुढ मृत्यूचे सत्र- मागील दोन-चार महिन्यात परळी शहर आणि एकूणच तालुक्यात अनेक गुढरित्या मृतदेह आढळून आले आहेत. मात्र त्या त्या हद्दीतील पोलिसांकडून अद्यापही कुठल्याच गुन्ह्याची उकल झाल्याचे ऐकिवात येत नाही. आता राज्य गुप्तचर विभागातील पोलीस निरीक्षकाचा मृतदेह रुळावर दोन तुकड्याच्या अवस्थेत आढळून आल्यामुळे नागरिकात मोठी घबराट आहे.