“कुतुबखाना खानकाह-ए नक्षबंदी”

ऐतिहासिक स्थळे/ ग्रंथालय-

🔷  सूफी मठाची सुरूवात इ.स १६४९ ला नक्षबंदी पंथाचे महान सूफी संत शेख अल इस्लाम हजरत सैय्यदशाह इनायत उल्ला हसनी कादरी नक्शबंदी यांनी केली.

नक्शबंदी’ हा इस्लाममधील सूफी तत्त्वप्रणाली चा एक पंथ आहे.

बाळापूर, जि. अकोला.- नमिता प्रशांत:
पुरातन काळापासूनच अकोला जिल्ह्यातील ‘बाळापूर’ हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेले स्थळ आहे. या अद्भुत पौराणिक वारसा स्थळांपैकीच एक ” कुतूबखाना खानकाह ए नक्षबंदी” हे ठिकाण. जेथे खुद्द माझ्या राजाचे, राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागलेत…त्याकाळी येथील सुफ़ी संतांच्या दर्शनाला येऊन गेलेत..अशी पावन जागा .

नुकतीच या स्थळाला भेट दिली. उत्सुकता होती ती येथील प्राचीन हस्तलिखिते आणि अलौकिक असे सुवर्ण अक्षरातील हस्तलिखित ग्रंथ बघण्याची. हस्तलिखित “सोन्याची अक्षरे”…वाह…
तसेंच येथे धार्मिक, आध्यात्मिक, साहीत्यच नाहीतर न्याय क्षेत्राशी संबंधीत वा व्यायामासारख्या शारिरीक कसरतीशी संबंधीत बाबीही तुम्हांला अवाक करून सोडतात.

या सूफी मठाची सुरूवात इ.स १६४९ ला नक्षबंदी पंथाचे महान सूफी संत शेख अल इस्लाम हजरत सैय्यदशाह इनायत उल्ला हसनी कादरी नक्शबंदी यांनी केली. आणि त्यांनीच येथे “कुतुबखाना खानकाह-ए नक्शबंदी” या ग्रंथालयाची स्थापना केली. त्यांनी आपल्या गुरूच्या आज्ञेनुसार इथवर प्रवास करत अखेर बाळापूरातील मन व मस नदीच्या संगमाने पावन झालेल्या या जागेची निवड आपल्या खानकाहसाठी केली. त्यांनी या कुतुबखान्यामध्ये फक्त धार्मिक पुस्तकांनाच महत्व दिले नाही तर इतिहास, आत्मवृत्त, वृत्तपत्रे, तवारिखा, कविता, शायरी, प्रवासवर्णन, विनोदी साहीत्य, बाल साहित्य, चित्रे, नकाशे, मासिके इत्यादिंचा अनमोल व प्राचीन असा वारसा येथे जतन केला. येथील हस्तलिखिते बघत असतांना चार तास कसे निघून गेलेत कळले देखील नाही. डोळ्यांचे पारणें फेडणारे अद्भुत अक्षरलेखन बघावंयास मिळाले. मूळ सुफ़ी संत इनायत उल्ला नक्षबंदी यांची बावन्नावी पिढी म्हणजे सय्यद तलहा नक्षबंदी सर हे येथील ग्रंथालयाचे आत्ताचे पालक आहेत. अतिशय प्रेमाने आणि काळजीपूर्वक त्यांनी आमच्यासमोर हा ऐतिहासिक खजिना उघडून ठेवला. येथे कुराण शरिफच्या विविध आकारातील चार प्रती ज्या सोन्याच्या शाईने लिहिल्या आहेत त्या या ग्रंथालयात बघावंयास मिळतात. ही शाई एका विशिष्ट पद्धतीने तयार केली जात असे. नदीत मिळणारा सहान नावाचा दगड घेऊन त्या दगडावर मध ओतून त्यासोबत सोने घासत असत. या मधात सोन्याचे कण मिसळून सोन्याचा अंश असणारी शाई तयार होत असे. नंतर त्यात वेगवेगळे रंग टाकून लिखाण केले जात असे. यांचपद्धतीने लिहिलेल्या कुराणाच्या प्रती या ठिकाणी उपलब्ध आहेत.

अरबी, फारशी व उर्दू भाषेतील अशी अनेक दुर्मिळ ग्रंथ, मासिके, त्रैमासिके, अर्धवार्षिके, वृत्तपत्राच्या प्रती हस्तलिखिते, अप्रकाशित साहीत्य इत्यादी. संपदा ज्यावरून आपणांस सुफी मताचा सखोल अभ्यास करता येईलच, तसेंच इतरही धार्मिक शाखांचा अभ्यास करता येईल अशी साहीत्य संपदा सुद्धा येथे उपलब्ध आहे.
‘कुतुबखाना’ म्हणजे ग्रंथालय. जेथे पुस्तकांचा संग्रह जतन करून ठेवला जातो. ‘खानकाह’ म्हणजे जेथे सूफी संत निवास करतात. आपण ज्याला मठ किंवा आश्रम म्हणतो. खानकाहमध्ये नेहमी भ्रमंती करणारे दरवेश म्हणजेच संत राहत असत.

‘नक्शबंदी’ हा इस्लाममधील सूफी तत्त्वप्रणाली चा एक पंथ आहे.
या कुतुबखान्याला महत्व याचमुळे प्राप्त झाले, की तो सूफीपंथाचा भारतात उदय झाल्याच्या प्रारंभिक काळातील खानकाह मधील कुतुबखाना आहे. खरं सांगायचं तर,हा भारतातील एक अतिशय प्राचीन कुतुबखाना आहे. आणि एक समृद्ध वारसाही…
विशेष म्हणजे… राजे छत्रपती शिवाजी महाराज, हैदराबादचे निजाम, औरंगजेब, इस्माइलखान पन्ही यांच्या या प्रांताशी आलेला संबंध आणि येथील सूफीसंताशी झालेली भेट, तसेंच या सर्वांनी या कुतुबखाना व खानकाहाला कशास्वरूपात मदत केली. याची संपूर्ण माहिती व दस्तावेज कुतुबखान्यातील पुस्तकांमध्ये आहेत.
येथे शिवाजी महाराजांनी भेट दिल्याचा उल्लेख असलेले पुस्तक ‘तारिख ए हिंद का इन्कलाबी किरदार शिवाजी महाराज’ हे एम के शाजली लिखित पुस्तकाची प्रत, तारिख ए फरिश्ता, तारिख ए अमजदी, तजकिराए अवलिया ए दख्खन (मूळ हस्तलिखित) तसेच येथील व वन्हाडातील लोकांनी लिहिलेले महत्त्वपूर्ण ग्रंथ या कुतुबखान्यात उपलब्ध आहेत. या पुस्तकांवरून आपण राजकीय इतिहासाचा सखोल अभ्यास करू शकतो. मौलाना अबुल कलाम आजाद यांनी संपादित केलेल्या अल हिलाल या वृत्तपत्रांच्या प्रतींचा येथे संग्रह आहे. या व उपरोक्त अश्या बाबीवरून त्या काळचे राजकीय चित्रण करता येते. तत्कालिन इतिहासाचे कधीही उलगडा न झालेली तथ्ये कदाचित समोर येऊ शकतील इतकी समृद्ध ग्रंथपरंपरा येथे जोपासण्यात आलेली आहे. या ग्रंथालयाला खुद्द राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तसेच निजामाने अनुदान दिल्याचा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांनी रुपया प्रतिदिवस देऊ केलेल्या देणगीचे इ. स. १९६० सालात त्याचे मूल्य १ हजार ४२८ प्रतिदिवस एवढे होतें.
या ठिकाणी हजार ते बाराशे अप्रकाशित हस्तलिखिते असल्याची नोंद आहे. तसेंच उर्दू लिपीतील गीता, रामायण, महाभारत ही प्राचीन ग्रंथेही हस्तलिखित स्वरूपात येथे आहेत. हा अतिशय दुर्मिळ असा खजिना आहे.

हा कुतुबखाना खरं तर एक समृद्ध साहित्यिक वारसा म्हणून जतन करणे आवश्यक आहे. मात्र या अनमोल पुस्तकांचे आयुष्य दिवासेंदिवस कमी होत आहे.

अमरावतीचे लेखक श्री. श्याम देवकर सरांनी त्यांच्या एका पुस्तकात सुचविल्या प्रमाणे, या ग्रंथालयातील पुस्तकांना क्रमबद्ध व सुचीबद्ध करून त्याचे विषयनिहाय विभाजन करणे गरजेचे आहे. या पुस्तकांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोपासना होणे, त्यांची नोंद होणे, प्रकाशित होणे किंवा ते आतंरजालावर सुरक्षित साठवुन ठेवले जाणे आवश्यक आहे. त्याशिवाय येथील अप्रकाशित साधने काळाच्या ओघात टिकू शकणार नाहीत. हस्तलिखिते व अप्रकाशित साहीत्याचे शासनस्तरावर संकलन व संपादन करून ते प्रकाशित करणे सुद्धा तितकेच गरजेचे वाटते. तसेच अरबी, पर्शयन, उर्दू भाषेतील ग्रंथाचे मराठीत भाषांतर केल्यास सामान्य वाचकांना त्या काळातील इतिहास समजून घेणे सोपे जाईल. काळाच्या ओघात येथील पुस्तके आहे त्या स्थितीत आणखी काही वर्षे अशीच राहिल्यास ती नष्ट होण्यास फारसा अवधी लागणार नाही. या ग्रंथालयातील पुस्तकाचे तांत्रिक व संगणकाचे मदतीने ते सुरक्षित करणे सुद्धा गरजेचे आहे. तसे केल्यास हा ठेवा अधिक लोकापर्यंत सहज पोहचू शकेल.

संगणकीय आंतरजालावर सुद्धा ही माहिती उपलब्ध करून दिल्यास ती टिकवून ठेवणे अधिक सोपे तर जाईलच त्याशिवाय तो ठेवा सामान्य वाचकांना सहज उपलब्ध होईल. या ग्रंथाचे योग्य रासायनिक प्रक्रियेने जतन करणे सुद्धा आवश्यक आहे. कारण साठवणूकिच्या अपुऱ्या सोई, दुर्लक्ष, योग्य प्रक्रियेचे अज्ञान, आर्थिक अडचण व पुरेश्या जागरूकतेचा अभाव यामुळे हा ठेवा नष्ट होण्याचे मार्गावर आहे. वाळवी, पाणी लागल्याने ही पुस्तके आज हाताळण्या योग्य सुद्धा राहिलेली नाहीत.

आज या ग्रंथाचा, पुस्तके, हस्तलिखिते व अप्रकाशित साधनांचा अभ्यास करण्यासाठी देशविदेशातील संशोधक येथे सतत भेटी देत असतात. अर्थातच अतिशय मौल्यवान ठेवा आहे. अवश्य एकदा भेट द्यावी. चित्रकार तसेंच विशेष अक्षरलेखन करणाऱ्या चित्रकरांनी आवर्जून एकदा भेट द्यावी.

नमिताप्रशांत 🌿

(विदर्भातील ही ठिकाणे बघण्याकरिता खामगांवचे श्री. विवेक चांदुरकर सरांचे आम्हांस वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. मी त्यांची शतशः आभारी आहे.)