क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीन;’अग्नि- ५’ ची चाचणी यशस्वी

🔷 पंतप्रधानांनी केले अभिनंदन

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था- एकाचवेळी अनेक वॉरहेडस् सोडू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या ‘अग्नि- ५’ या क्षेपणास्त्राची सोमवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. दिव्यास्त्र नावाने ओळखल्या जाणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. अग्नि-५ या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आता चीन आला असून यशस्वी चाचणीमुळे लाल ड्रॅगनच्या छातीत धडकी भरली आहे.

ओडिशाच्या बालासोर येथे डीआरडीओच्या वतीने सोमवारी अग्नि ५ची चाचणी घेण्यात आली. २०१२ पासून भारत या
क्षेपणास्त्राच्या विविध चाचण्या घेत सोमवारी लक्ष्यभेदाची ही चाचणी होती. या चाचणीची माहिती ट्विटरच्या माध्यमातून देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, मिशन दिव्यास्त्र यशस्वी करणाऱ्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचा आम्हाला अभिमान आहे. पूर्णपणे भारतात तयार झालेल्या अग्नि-५ क्षेपणास्त्राची ही यशस्वी चाचणी सर्वांना बळ देणारी आहे. लांब पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रधारी देशांच्या रांगेत भारत समाविष्ट झालाच आहे. त्यात आता या अत्याधुनिक तंत्राचा वापर करणाऱ्या निवडक देशांत भारताचा समावेश झाला आहे.

🔸 सध्या फक्त अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनकडे अशी क्षेपणास्त्रे आहे. 🔸  मल्टीपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रिएन्ट्री व्हेईकल असे या यंत्रणेचे नाव आहे. त्यात मुख्य क्षेपणास्त्राला एकापेक्षा अधिक वॉरहेडस् असतात.
🔸  ही वॉरहेडस् वेगवेगळ्या दिशांना, वेगवेगळ्या लक्ष्यांवर, वेगवेगळ्या वेगाने सोडण्याची सुविधा
🔸 यासाठी बहुलक्ष्य निर्धारण ही संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा काम करते.