मनोज जरांगे पाटील 20 मार्च रोजी परळीत!

भव्य महासंवाद बैठकीचे आयोजन; हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार

बीड / परळी-वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क – मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील येत्या 20 मार्च रोजी परळीत येत असून, ते सकल मराठा समाजाची महा संवाद बैठक घेणार आहेत. या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात येत असून यासंदर्भातील सकल मराठा समाजाची नियोजन बैठक मंगळवारी परळीत संपन्न झाली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सध्या राज्यभर मराठा समाजाच्या संवाद बैठका घेत आहेत. आरक्षणाबाबत दशा आणि दिशा याबद्दल ते महाराष्ट्रातील मराठा बांधवांना मार्गदर्शन करत आहेत. मराठा आरक्षणाची क्रांती भूमी असणाऱ्या परळी वैजनाथ शहरात मनोज जरांगे पाटील हे येत्या 20 मार्च रोजी येत असून, यानिमित्ताने भव्य महा संवाद बैठक संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन करण्यासाठी मंगळवारी सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली.

सोज्वल मंगल कार्यालय येथे झालेल्या बैठकीस परळी तालुक्यातील सकल मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक 20 मार्च रोजी परळी वैजनाथ येथे होत असलेल्या कार्यक्रमास बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील मराठा बांधव हजारोंच्या संख्येने येणार आहेत. यासाठी कार्यक्रमाचे भव्य आणि शिस्तबद्ध नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आली.