शेतकरी कीर्तन महोत्सव 21 मार्चला प्रारंभ

🔷 ज्ञान, विज्ञान आणि आरोग्य विषयक प्रबोधन
🔷 आध्यात्मिक चळवळीला नवी दिशा देणारा

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क- कीर्तन परंपरेतून आलेले ज्ञान, आधुनिक जगातील विज्ञान आणि वैद्यकीय अभ्यासातून घ्यावयाची आरोग्याची काळजी याबाबत प्रबोधन करणारा दुसरा कीर्तन महोत्सव 21 मार्च पासून धारुर तालुक्यातील कान्नापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत संजय आवटे आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ महाराज यांच्या उपस्थितीत होणार असून 21 गावांनी एकत्र येऊन तुकाराम महाराज बीज उत्सवाच्या निमित्ताने या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती या सोहळ्याचे संकल्पक शेतकरी नेते एड. अजय बुरांडे यांनी दिली.

शेतकरी वर्गाला केंद्र स्थानी ठेऊन आयोजिलेल्या या कीर्तन महोत्सवात कोणत्याही प्रकारचा झगमगाट न करता प्रबोधनाला प्राधान्य दिले जाते. या वर्षी या कीर्तन महोत्सवात शेतकरी आरोग्याला प्राधान्य दिले असून दर दिवशी एका आजारावर आरोग्य शिबीर आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. त्या-त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर या आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.

या कीर्तन महोत्सवात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोळकर, कर्क रोग तज्ज्ञ डाॅ. हरीराम गडदे, हे मार्गदर्शन करणार आहेत. तर याच सोहळ्यात भगतसिंग शहीद दिनानिमित्ताने रक्तदान शिबिराही आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्यात पंचफुला प्रकाशनचे डाॅ. बालाजी महाराज जाधव, तुकाराम महाराज विचार प्रचारक विजय महाराज गवळी, नारायण बाबा संस्थान वांगीचे अध्यक्ष एकनाथ महाराज माने, विवेकी कीर्तनकार तुळसीराम महाराज लबडे, परिवर्तनवादी युवा कीर्तनकार गणेश महाराज फरताळे, नामदेव-तुकाराम वारकरी परिषदेचे माजी अध्यक्ष मधुकर महाराज बारुळकर यांची कीर्तने होणार आहेत. तर कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महराज जाधव, तुकडोजी महाराज संस्थान मोजरीचे ज्ञानेश्वर महाराज रक्षक, तुकाराम महाराज साहित्य अभ्यासक आनंद महाराज काकडे, मूल निवासी वारकरी महासंघाचे रामेश्वर महाराज त्रिमुखे, पसायदान प्रसारक मुबारक भाई शेख, तुकाराम महाराज गाथा प्रेमी भारत महाराज घोगरे गुरुजी यांची प्रवचने होणार आहेत. वारकरी विचार मंचचे अध्यक्ष शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे, असेही एड.अजय बुरांडे यांनी सांगितले.