“सीतेची न्हाणी” ता.पातूर, जि. अकोला.

पर्यटन स्थळे/भ्रमंती/धार्मिक/

ता.पातूर, जि. अकोला. नमीताप्रशांत- आपण काल पातूरमधील वसाली गाव बघितलंना…त्याच गावात गाडी उभी करून दोनेक किलोमीटर दाट जंगलातून पायी पायी प्रवास करत आपण पोहोचतो प्रसिद्ध अशा “सीतेची न्हाणी” या स्थळाला. पावसाळ्यात येथे जाणे कठीणच कारण मध्ये दोनदा नदी पार करावी लागते. नदीचे नाव भारीये ‘विश्वामित्र’….नदीचे पाणी ओसरल्यावरच येथे जाणे शक्य होतें. तसं पाहिलं तर, आता गुहेपर्यंत गाडी जाऊ शकते मात्र रस्ता खडकाळ असल्याने जोखीम उचलू नये. शिवाय आम्हाला पोहोचेपर्यंत अंधारही पडला होता.. आणि पदभ्रमण करण्यातली मज्जा वेगळीच असते. एवढी मेहनत घेऊन तिथे गेल्यावर मात्र आमचा भ्रमनिरास झाला, कारण गुहेंतर्गत केलेलं आवाजवी बांधकाम, मुर्त्या, पायऱ्या, कमान…???

संपूर्ण भारतात वा इतरही असंख्य ठिकाणी, जिथे जिथे श्रीराम आणि कुटुंब फिरस्ती करीत राहिले अशा निबीड अरण्यांमध्ये, डोंगर दऱ्यांमध्ये, कपाऱ्यांमध्ये “सीतेची न्हाणी” हा गुहांसदृश प्रकार अथवा पाण्याचे खळगे अथवा नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पाण्याच्या टाक्या आपण सगळ्यांनी कधीनाकधी बघितलेल्या असतात अथवा ऐकिवात तरी असतातच…खरं म्हणजे, डोंगरदऱ्यांच्या कुशीत लपलेल्या गुहांमधील पाण्याचे हे नैसर्गिक जलस्रोत निसर्गाची अद्भुत देण असते. शक्यतोवर घनदाट जंगलांमधील ह्या जागा भर उन्हाळ्यात जेव्हा नद्याचे किंवा इतर जलस्रोतातील पाणी आटलेले असते तेव्हा वन्य प्राण्यांकारिता संजीवनीचं काम करतात त्यामुळे एकवेळ सीतेची न्हाणी म्हणून का होईना पण अशा गुहांचं संवर्धन झालं तर बरं तरी आहे मात्र उगाच तेथे बांधकाम करून, मंदिर उभारून त्या ठिकाणाचं नैसर्गिक सौंदर्य आणि प्रत्येकाच्या मनात लपलेलं कुतूहल संपवण्यात काय अर्थ आहे????? कळतच नाही????

शिवाय, सीतेच्या आंघोळीसाठी लागणारं पाणी गरम असावं म्हणून लक्ष्मणाने अथवा रामाने बाण मारून ते गरम केलं आणि आश्चर्य ते नेहमीसाठी तसंच राहिलं म्हणजे ते गरम पाण्याचं कुंड तयार झालं..पण अगदी मनापासून सांगायचं झालं तर, अशा कथा रचून आपण आपल्या नव्या पिढ्यांना निसर्गाच्या अद्भुत रचनेच्या ज्ञानापासून वंचित ठेवतोय. या डोंगरदऱ्यांमध्ये नैसर्गिक बदलांतून घडणाऱ्या रासायनिक क्रियांमुळेच कुठे गरम पाण्याचे तर कुठे थंड पाण्याचे हे जलस्रोत तयार होत असतात. आपण निसर्गात लपलेली खरोखरची जादूई दुनिया मुलांसमोर कां उलगडत नाही, का प्रत्येकवेळी आपण त्यांना आख्यायिकांमध्ये गुंफतो..मानवी देहाने केलेला चमत्कार समजतो… का आपण निसर्गालाच देवाचं रूप मानत नाही… फक्त म्हणायलाच तो निराकार आहे कां???
असो, हा विषय फार मोठा आहे. आपल्याला जर निसर्गाच्या अद्भुत रूपांचे भावदर्शन करायचे असेल तर जंगलातील मानवी हस्तक्षेप टाळावे लागतील. शहरात ठिकठिकाणी देव मांडलेला दिसतो. जंगले तरी सोडूयात…जिथे कुठे अशा गुहा असतात तिथे एकतर महादेवाची पिंड स्थापन केलेली असते अथवा साधू संतांचा मठ किंवा आश्रम तरी असतोच आणि मग या नैसर्गिक अधिवासांचं रूपांतर हळूहळू मंदिरात होतं. विषय गंभीर आहे. असो…

हे एक अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. चारही बाजूनी डोंगरदऱ्यांमध्ये लपलेलं, दाट जंगलाने नटलेलं, शांततेत विसावलेलं सुंदर स्थळ…मात्र फार आतमध्ये असल्याने या भागात कधी येणंजाणं झालं तरच इथं यावं.. विशेष सप्टेंबर ऑक्टोबर यादरम्यान छानच वाटत असेल यायला.😊