मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणा साठी २८ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई: मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील ज्या विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी २८ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, शैक्षणिक दाखला, ट्रान्सफर सर्टीफिकेट, आधार, पॅन, मतदानकार्ड, पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे, उत्पन्न दाखला इत्यादी कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय मुंबई शहर/उपनगर, रुम नं. ३, गृहनिर्माण भवन, म्हाडा बिल्डिंग, कलानगर, वांद्रे (पूर्व) मुंबई ४०० ०५१ या पत्त्यावर अर्ज करावेत. २८ मार्च २०२४ नंतर कोणतेही प्रशिक्षणाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. प्रशिक्षण विद्या वेतनासाठी विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयातून विनामूल्य मिळतील.

जिल्ह्यातील मातंग समाज बांधव व तत्सम बारा पोटजातीमधील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थी मांतग समाजातील व तत्सम बारा पोटजातीतील असावा, त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे. यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच प्रशिक्षणार्थीने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा.

याअंतर्गत मुंबई शहरातील २०० मुंबई उपनगरातील २०० विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे. मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत याकरिता सन-२०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त झाले आहे, असे महामंडळाचे मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.