महिला महाविद्यालयात भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरचे ( BARC ) डॉ. रघुमणिसिंग व प्रो. फडणीस यांची भेट.

🔷🔸महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचा नवोपक्रम
🔷🔸 वैज्ञानिकांनी विद्यार्थ्यांना रिसर्च सेंटरमधील कार्याची करून दिली ओळख.

बीड/परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी-विज्ञानाचे पाईक आम्ही, स्वदेशसेवा करण्या नामी | या कवीच्या उक्तीला अनुसरून देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणारी संस्था म्हणजे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर. त्यात काम करणारे वैज्ञानिक म्हणजे देशोन्नतीचे खरे शिल्पकार. अशा दोन वैज्ञानिकांनी लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयास भेट दिली.   विद्यार्थ्यांना वैज्ञानिकांचा परिचय व्हावा व त्यांचे मार्गदर्शन लाभावे यासाठी भौतिकशास्त्र विभागाने याप्रसंगी अतिथि व्याख्यानाचे आयोजन केले.
भाभा आँटोमिक रिसर्च सेंटरमधील वैज्ञानिक डॉ. रघुमणिसिंग निंगथुजम , प्रो. प्रसाद फडणीस या दोहोंची ज्ञानपूर्ण बोधप्रद व प्रेरणास्पद व्याख्याने झाली. सो निंगथुजम यांचीही विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. विवेकानंद कवडे यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. रघुमणिसिंग यांनी मणिपुरच्या छोट्याश्या गावापासून चालू झालेला आपला शिक्षणप्रवास कानपुर आयआयटीतील पीएच.डी. उपाधीच्या मार्गाने भा.आँ. रिसर्च सेंटरपर्यंत कसा झाला याचा प्रेरक आढावा आपल्या व्याख्यानातून घेतला. भारतीय विद्यार्थ्यांनी तीव्र जिज्ञासा ठेवावी व त्या जिज्ञासेची परिपूर्ती करण्याचे धाडस अंगी बाणवावे असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

यानंतर भा. ऑ. रि. सेंटरच्या प्रो. प्रसाद फडणीस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तुम्ही विज्ञान व गणितासारखे विषय तर काळजीपूर्वक शिकाच पण त्याबरोबर हिंदी व इंग्रजीमध्ये तुम्हाला सहज संवाद साधता आला पाहिजे यावरही त्यांनी भर दिला. माहिती नसलेली गोष्ट शाधणे म्हणजे संशोधन अशी ढोबळ व्याख्या संशोधनाची करता येईल. असं म्हणतात की अपघातानेच शोध लागतात.  रिसर्च सेंटर मधील आपल्या कार्याचे स्वरूप त्यांनी विशद केले. चार हजाराहूनही अधिक वैज्ञानिक अहर्निश कार्यरत असलेल्या या रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्याकडे टोमॅटो,बटाटे,रवा इत्यादी नाशिवंत पदार्थांवर सनियंत्रित रेडियशन द्वारे टिकावूपणा व गुणवत्ता वाढवण्यासाठी संशोधन करण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर कँन्सरसारख्या असाध्य रोगाचे वेळीच निदान व या रोगावर उपचार करणे हेदेखील त्यांच्या टीमच्या संशोधनाने शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जिज्ञासा ठेवली तर आमचे सेंटर तुम्हालाही नक्कीच मदत करील असेही आश्वासक वचन त्यांनी दिले. यानंतर अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थिनींना विज्ञाननिष्ठ होण्याचाही मूलमंत्र सांगत वैज्ञानिकांचे आभार मानले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. शरद रोडे व आभार प्रकटन प्रा. डॉ. विलास देशपांडे यांनी केले.