राज्यभरातून समाजबांधवांची गर्दी; अंतरवाली सराटीतील संवाद बैठक
जालना- वडीगोद्री : गावागावातून उमेदवार देण्यापेक्षा प्रत्येक जिल्हयातून एक अपक्ष उमेदवार उभा करून त्यास निवडून आणू, असा निर्धार राज्यभरातून आलेल्या समाजबांधवांनी अंतरवाली सराटीत केला. दरम्यान, सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसह मराठा युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आपण समाजाच्या बैठकीत आपल्या मागणीला पाठिंबा देऊन पाठपुरावा करणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आणि गावागावातून उमेदवार देण्यापेक्षा प्रत्येक
जिल्ह्यातून कुठल्याही जातीधर्माचा एकच उमेदवार देऊन त्याच्यासाठी इमानेइतबारे काम करण्याचा पर्याय मांडला होता.
शंभर टक्के मतदान करा
कोण कुठल्याही पक्षात असला तरी आधी समाज आहे. समाजाला अग्रस्थानी ठेवत लेकरांच्या कल्याणासाठी आवाज
उठविला पाहिजे, प्रचार सभेला, राजकीय बैठकीला जायचे नाही किंवा प्रचार करायचा नाही, कुणी आपल्याला
आरक्षण देत नसेल तर तुम्ही देणारे बना, असे आवाहन करीत जरांगे पाटलांनी सर्व राजकीय पक्षांतील मराठा
समाजाच्या लोकांना एकत्र बसवून त्यांची मते जाणून घ्या, गावांचे मत घ्या आणि जिल्ह्यातील कुठल्याही जातीधर्माचा
एक उमेदवार देण्याच्या पर्यायावर चर्चा करा, शंभर टक्के मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.
मी निवडणूक लढणार नाही
संवाद बैठकीत बोलताना जरांगे पाटील यांनी राजकारण आपला पिंड नसून, मी कुठलीही निवडणूक लढविणार नाही. कुणीही राजकारणात आपल्याला ओढू नये, समाजासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढू. मात्र, राजकारणाशी आपला कसलाही संबंध नाही. फॉर्म भरण्याच्या भानगडीतही मला टाकू नका, तुम्ही तुमच्या पातळीवर सर्वांशी सल्लामसलत
करून निर्णय घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.