मुंबईत सर्वोत्तम फिल्म सिटी साकारण्याचे काम शिंदे यांच्याबरोबर आपल्याला पूर्ण करता येईल- गोविंदा
॥ उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लढन्याची शक्यता
मुंबई : अभिनेता गोविंदा यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भवन येथे शिवसेनेत प्रवेश केला. कोणत्याही अटी न ठेवता गोविंदा यांनी हा प्रवेश केल्याचे शिंदे यांनी सांगितले. मात्र उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांच्याविरोधात गोविंदा यांना शिवसेना उमेदवारी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश केला असून आपला १४ वर्षांचा राजकीय वनवास संपला आहे, अशी प्रतिक्रिया गोविंदा यांनी दिली आहे.
पत्रकार परिषद घेत गोविंदा यांना शिवसेना प्रवेश देण्यात आला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार मिलिंद देवरा आदी शिवसेना नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी गोविंदा म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईत अनेक बदल दिसून आले आहेत. मुंबई सुंदर दिसू लागली आहे. हवा बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा स्वच्छ असल्याचे गोविंदा म्हणाले. विश्वातील सर्वोत्तम फिल्म सिटी साकारण्याचे काम शिंदे यांच्याबरोबर आपल्याला पूर्ण करता येईल, असा विश्वास असल्याचेही गोविंदा म्हणाले.