पर्यटन /भ्रमंती /पुरातन मंदिरे/वास्तूकला/मंदिर बांधकाम शैली
अमरावती-अमरावती -नागपूर प्रवास आमच्यासाठी काही नवा नाही. घर अंगण म्हणावा असाच… मात्र तरीदेखील, माहिती असूनही.. एवढ्यांदा या मार्गाने प्रवास करूनही, ‘बाजारगाव’ हे सुंदर ठिकाण पाहायचं राहूनच जायचं. आमचं कारण काय असेल तर, गाडीचा वेग.. होय..यंदाही थोडं समोर आल्यावर प्रशांत म्हणाला, अरे यार…आज तरी गेलो असतो आपण आणि गजूने झटकन गाडी यू टर्न मारली. त्यामुळे यंदा आमचं बाजारगाव दर्शन पूर्णत्वास गेलं. बाजारगाव हे अमरावती- नागपूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गांवर (NH6)येणारं छोटंसं गाव आहे. गावात प्रवेश करताच प्रथम दिसलं ते थोडं अस्वच्छ गाव, त्यानंतर काही पुरातन मंदिराचे कळस दिसू लागले त्यामुळे गाडी प्रथम तिकडे वळली. गावातील लगोलग असलेली ही पुरातन शिव आणि विष्णू मंदिरे. ही मंदिरे सॅन्डस्टोन मधली असून प्राचीन आहेत. दगडांची प्रचंड झीज झालेली आहे. येथील फार काही इतिहास मला माहिती नाही, परंतू ही जागा एक सुवर्णयुग अनुभवलेली जागा आहे असं ऐकलंय.
राज्य सरकारने या धार्मिक स्थळाला ‘क’ वर्ग पर्यटन दर्जा दिला असून पुरातत्त्व विभागाने या परिसरातील मंदिरांचा विकास केलेला आहे. मात्र मंदिराची अवस्था बघता येथे आणखी लक्ष घालण्याची गरज आहे असे प्रकर्षाने जाणवते. असो,
आम्ही येथील प्रसिद्ध गणेश हनुमान मंदिर ऐकून गेलो होतो मात्र ते न सापडल्याने, विचारणा केली असता ग्रामस्थांनी आम्हाला तलावाकडे जावयाचे सुचविले. गाडी वळवून सरळ आत घेऊन जाताच अगदी दोन मिनिटांवर अतिशय स्वच्छ सुंदर अचंबित करणाऱ्या देखाव्याने आमचे लक्ष वेधून घेतले आणि तोंडातून सहजच ‘आहाहा’ बाहेर पडले.
स्वच्छ सुंदर तलाव, शांत परिसर, मंद धुंद वातावरणात जलविहार करणारे पक्षी, तीनही बाजूनी वेधलेली डोंगरमाळ आणि त्यावर नटलेली वनराई… अतिशय सुंदर…तलावाकाठी असलेली सुमारे साडे तीनशे-चारशे वर्षं जुनी गणेश आणि हनुमानाची प्रसन्न मूर्ती. सगळंच अफाट…
गावात शिरताच दिसलेलं दृश्य आणि थोडं समोर येताच क्षणात बदललेलं दृश्य… दोहोंमध्ये फार तफावत होती.
एकदा जरूर भेट द्या… सुंदर स्थळ आहे.
– नमिताप्रशांत