रोटेरियन प्रा.शांतीलाल लाहोटी यांचे निधन

बीड /परळी वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क:-परळी- अंबाजोगाई सह संपूर्ण बीड जिल्ह्यात सर्वपरिचित असलेले व्यक्तिमत्व व एक अभ्यासू संशोधक व शेतीनिष्ठ प्रा शांतीलाल लाहोटी यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने परळीतील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील एक अभ्यासू चेहरा हरवला आहे.

योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई येथे अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले परळी येथील सुभाष चौक भागातील रहिवासी प्रा. शांतीलाल लाहोटी यांचे आज दि.२ रोजी पुणे येथे निधन झाले. मृत्यू समयी ते सुमारे 78 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रा.डॉ. शांतीलाल लाहोटी हे परळी अंबाजोगाई सह संपूर्ण बीड जिल्ह्यात परिचित होते. विविध सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, मानवलोक आदी विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांशी व त्यांच्या कार्यात ते संबंधित होते. रोटरी क्लब  परळी चे ते माजी अध्यक्ष होते.एक अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. परळी व अंबाजोगाई येथील विविध सेवाभावी व सामाजिक उपक्रमांमध्ये ते सक्रिय सहभागी होत असत. संशोधनाच्या क्षेत्रातही त्यांचे मोठे कार्य राहिले आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना विविध विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने दिलेली आहेत. त्याचबरोबर अनेक संशोधनही केली आहेत. त्याशिवाय एक शेतीनिष्ठ प्राध्यापक म्हणूनही त्यांची ओळख आहे. शेतीशी नाळ घट्ट जोडून प्रगत शेती करण्यासाठी नवनवीन प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी अशीही त्यांची ओळख होती. परळी वैजनाथ येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीचे ते संचालक म्हणूनही कार्यरत होते. त्याचबरोबर महेश सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तसेच लाहोटी चारिटेबल ट्रस्टचे बीड जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यांमध्ये ते सहभागी असायचे. शिक्षण क्षेत्रातील व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने देण्यात येणारे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या निधनामुळे परळीतील एक अभ्यासू, संशोधक व शेतीनिष्ठ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

अंत्यसंस्कार दि ३ एप्रिल २०२४ सकाळी ९ वाजता 
दरम्यान प्रा.डॉ. शांतीलाल लाहोटी यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथे दि. 3 रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुभाष चौक येथील त्यांच्या निजी निवासस्थानापासून सकाळी नऊ वाजता अंत्ययात्रा निघणार असल्याची माहिती लाहोटी कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे.