जल व्यवस्थापन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔷 पर्जन्यमान -जलव्यवस्थापन

आपल्या देशाचे संविधान करते म्हणून डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सर्वांनाच माहिती आहे. मात्र त्यांनी विविध जबाबदाऱ्या स्वीकारल्या त्या विविध क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान खूप महत्त्वाचं ठरतं. आपल्या देशात लोकशाही कशा पद्धतीची असावी आणि प्रत्येकाचे अधिकार आणि कर्तव्य निश्चित करण्याचे काम संविधानातून त्यांनी केले त्यांच्या इतकेच मोलाचे काम त्यांनी एक जलतज्ज्ञ या भूमिकेतून केले. यावेळी विषयातील तज्ज्ञ म्हणून त्यांनी दिलेले योगदान आजच्या काळात अतिशय आवश्यक ठरत आहे.
🔸प्रशांत दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी, बीड

आपला देश भौगोलिक दृष्ट्या पर्जन्याचा विचार करता मौसमी हवामानाच्या प्रदेशात येतो देशाची अर्थव्यवस्था मुख्यत: कृषी आधारित व्यवस्थेवर अवलंबून आहे आणि ही कृषी व्यवस्था चार महिन्यात पडणाऱ्या मौसमी पावसावर अवलंबून आहे. देशाचा भौगोलिक विस्तार खूप मोठा आहे त्यामुळे दक्षिणेकडून येणारा मोसमी पाऊस देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या काळात पोहोचतो त्यातीलच काही भाग प्रजन्य छाया क्षेत्रात आहेत.

पावसाच्या विषम प्रमाणामुळे आपल्या देशात एकाच वेळी काही भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य अर्थात कोरडा दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टी झाल्याने पूरजन्य परिस्थिती असे चित्र सातत्याने आपण बघतो. एकाच काळात देशात काही भागात नागरिक पाण्यासाठी त्रस्त व काही भागात पाण्याने ग्रस्त असल्याचे हे चित्र दिसते. निसर्गावर नियंत्रण मिळवणं शक्य नाही. यातून निर्माण होणाऱ्या संकटावर मात करायची असेल तर पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि नियोजन हाच एकमेव पर्याय हे डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाणले होते.
स्वतंत्र्य प्राप्ती पूर्वीपासून म्हणजे व्हाईसरॉय समिती (मंजूर) सदस्य असल्यापासून त्यांनी जल व्यवस्थापनासाठी ब्रिटिश सरकारला आग्रहीपणे जल व्यवस्थापनाची मागणी केली होती. 1943 मध्ये दामोदर नदीच्या भीषण अशा महापुराने झालेले नुकसान बघताना त्यांनी अमेरिकेतील टेनेसी प्रकल्पाप्रमाणे भारतातही पूर्ण यंत्रणासाठी धरण बांधून त्याचा वापर करण्याची मागणी केली. ब्रिटिश सरकारचे मुख्य अभियंता यांनी त्याच काळात इजिप्त मधील आस्वान धरण प्रकल्पावर काम केले होते. या ज्ञानाचा व त्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर भारतात व्हावा यासाठी डाँ आंबेडकरांनी प्रयत्न केले.
नद्यांमधील पाण्याचे व्यवस्थापन करताना त्याचा विविध प्रकारे वापर शक्य आहे यात पूरनियंत्रण करण्यासोबतच जलविद्युत निर्मिती करणे आणि धरणाच्या कालव्यांमधून सिंचनाद्वारे कृषी क्षेत्रासाठी केला जावा अशी भूमिका डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती.
पुढे स्वतः या कामाची धुरा सांभाळताना त्यांनी दामोदर खोरे महामंडळ तसेच सोन नदी आणि महानदी नियोजनात मोलाचे कार्य उभे केले. ओरिसामध्ये हिराकुड धरण प्रकल्पाने केवळ पूरसमस्या संपवली असे नव्हे तर ऊर्जा निर्मितीसह सिंचनाचे उद्दिष्ट साध्य करून या भागाचा पूर्ण कायापालट केला असं म्हणता येईल. कोसी नदी, चंबल नदीबाबत देखील याच दृष्टिकोनातून काम करण्यात आले.
केंद्र स्तरावरील पाणी धोरण असो अथवा जल ऊर्जा धोरण यातील डाँ. आंबेडकर यांचे कार्य अतुलनीय असेच आहे. पाणी धोरणानुसार आंतरराज्य पाणी वादात तोडगा काढणारा लवाद देखील तितकाच महत्त्वाचा आहे.

आज ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर आधीच अनिश्चित असणाऱ्या मोसमी हवामानावर परिणाम झाला आहे. प्रजन्यवृष्टीचे प्रमाण आणि कालावधी यात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करण्याची वेळ आली त्यासाठी नैसर्गिक ऊर्जा पर्याय असणाऱ्या जलविद्युत निर्मितीचे महत्त्व आज अनन्यसाधारण बनले आहे. भारतासारख्या अविस्तीर्ण आणि कृषी आधारित अर्थव्यवस्थेसाठी जलव्यवस्थापन हाच प्रगतीचा मोठा मार्ग आहे आणि त्याबाबत डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार आणि संकल्पना व त्याबाबत केलेले कार्य अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे ठरते. त्याची आवश्यकता दिवसागणिक जाणवते. अभ्यासू वृत्तीने प्रश्नांचे मूळ शोधून त्यांचे डाँ. आंबेडकर यांनी शोधलेले उत्तर त्यासाठीच मोलाचं आहे.