पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन

🔶 पहिली सार्वत्रिक निवडणूक- 🔶  निवडणूक आयोग -🔶 मतदान प्रक्रिया –

देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निमित्त अनेक गोष्टी प्रथमच घडत होत्या. देशांमध्ये विविध प्रांतात असणाऱ्या वेगवेगळ्या भाषा आणि त्यात साक्षरतेचे प्रमाण कमी अशा सर्व पात्र ठरणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचणे, त्यांचे नावे मतदार यादीत सामील करून घेणे यासह मतदान प्रक्रिया समजावून सांगणे आणि योग्यरीत्या मतदान करून घेणे आधी आव्हाने समोर होती.-  प्रशांत दैठणकर

या सर्व मतदान व मतमोजणीची प्रक्रिया प्रत्यक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील प्रशिक्षण देणे आवश्यक होते. या सर्व कामाचा आवाका प्रचंड असा होता. असा आवाका हाताळता येईल या दृष्टिकोनातून आयोगाची रचना आणि निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नेमणूक करायची होती. या कामासाठी त्यावेळी सरकारने भारतीय नागरी सेवेतील तत्कालीन सर्वोच्च अधिकारी असलेले पश्चिम बंगालचे मुख्य सचिव सुकुमार सेन यांची नियुक्ती केली. 2 जानेवारी 1899 ला जन्मलेले सेन हे कोलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजचे विद्यार्थी त्यानंतर त्यांनी लंडन विद्यापीठात शिक्षण घेतले व ते गणितातील सुवर्णपदकाचे मानकरी होते. भारतीय नागरी सेवेत ते 1921 मध्ये दाखल झाले 1947 साली त्यांची तत्कालीन ब्रिटिश सेवेतील सर्वोच्च पदावर अर्थात बंगालचे मुख्य सचिव या पदावर नियुक्ती झाली होती.

भारत सरकारने त्यांना निवडणुकीसाठी देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 1950 साली निवडले.
सेन यांच्यासमोर जे आव्हान होते ते खूप मोठे होते. देशात असलेल्या 21 वर्षे वयाच्या 17 कोटींहून अधिक मतदारांची नोंदणी करण्यापासून त्यांना सहजरित्या कळेल अशी सुलभ व्यवस्था निर्माण करायचे ते आवाहन होते. ज्यांना अक्षर ओळख नाही अशा मतदारांना लक्षात ठेवून पक्षनिहाय निवडणूक चिन्हे तयार करून घेणे त्याचे वाटप राजकीय पक्षांना करणे व त्याची संपूर्ण माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहचेल याची खात्री करून प्रक्रिया सुरू करणे ही केवळ सुरुवात होती.
सेन यांना सहाय्यक म्हणून आयोगात दोन आयुक्त आणि प्रत्येक राज्यातून एक मुख्य निवडणूक अधिकारी व त्यांच्या हाताखालील यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली.

देशाच्या भिन्न प्रांतात भिन्न भाषा हे एकच आवाहन त्यांच्या समोरचे आवाहन नव्हते. तर, त्या-त्या राज्यात असणारी तत्कालीन नैसर्गिक स्थिती याचाही विचार करावा लागणार होता. आज जितके दळणवळण सोपे आहे ते त्याकाळी नव्हते अनेक ठिकाणी जायला रस्ते देखील उपलब्ध नव्हते. त्या ठिकाणी मतदान केंद्र स्थापन करणे, कर्मचारी आणि मतपेट्या पोहोचविणे त्यांची सुरक्षा आणि सोबतच पारदर्शकता राखणे आदी आवश्यक होते.
देशात काही भागात पाणीच पाणी तर काही भाग कोरडा आणि हिमाचल लगतच्या जिल्ह्यात बर्फ अशी नैसर्गिक आवाहन देखील होती. या सर्वांचा विचार करून सेन यांनी केलेल्या यशस्वी नियोजनानुसार 68 टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडली आणि देशाला लोकशाहीतील लोकांनी निवडून दिलेली पहिले सरकार अस्तित्वात आले.

ज्याकाळी संपर्कासाठी दूरध्वनी देखील अत्यंत तोकडे होते. ग्रामीण भागात संपर्क शक्यच नाही. रस्ते नाहीत मतदान यंत्रणा प्रथमच काम करीत आहे आणि मतदार देखील प्रथमच मतदान करीत आहेत अशी ही पहिली निवडणूक आणि त्याचे नियोजन व पूर्णतापर्यंत पूर्ण जबाबदारी पार पाडणारे आयुक्त सुकुमार सेन.
सेन यांनी भारतासोबतच नंतरच्या काळात 1953 झाली सुदान या देशाचेही पहिले निवडणूक आयुक्त म्हणून काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सरकारने त्यांचा पद्मभूषण देऊन सन्मान केला. आज निवडणूक तशी सोपी झालीय रस्ते, रेल्वे यांच्या जोडीला हवाई मार्गाची सुविधा आहे. प्रत्येकाच्या हाती 5G तंत्रज्ञानाचा स्मार्टफोन आहे म्हणूनच हे स्मरण आवश्यक. प्रत्येक मतदाराला याचा आरंभ देखील मतदानाची प्रेरणा ठरवा.

प्रशांत दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी
बीड
+919823199466