वादळी वारे आणि मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटाची अंदाज ; प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना :
अहमदनगर : कमी अधिक प्रमाणात राज्याच्या सर्वच भागात गेल्या मागील १५ दिवसांपासून तीव्र उन्हाच्या अतित्रीव झळा त्रासदायक होत आहेत. लहान मुले , आणि जेष्ट नागरिक हैराण झाले आहेत. हवामान खात्याने जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान खात्याद्वारे दिलेल्या माहिती नुसार अहमदनगर जिल्ह्यात ७ ते ९ एप्रिल असे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यात तापमान ४० अंशापर्यंत नोंदवले जात आहे. मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सुरू झाली आहे. त्यात दररोज वाढ होत आहे. अशातच आता हवामान खात्याने जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. ६ ते ८ एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्याच्या विदर्भ विभागात ७ व ९ तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. दरम्यान, दोन दिवसांपासून उकाडा जाणवत आहे. नाशिक, अहमदनगर, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ६ एप्रिलनंतर अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली उभे राहू नये, विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल यांच्यापासून दूर राहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. अधांतरी लटकणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा, असेही सूचनांमध्ये म्हटले आहे.
शेतीमालाची घ्या काळजी
काही भागात कांद्याची काढणी सुरु आहे. अवकाळी पाऊस व वादळी वारा यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकयांनी वेळीच नियोजन करावे. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
