प्रेरणादाई पर्यटन/भ्रमंती /इतिहास / माहितीपूर्ण
सिंदखेड/ बुलढाणा. -के नमिता प्रशांत –कर्तव्यनिष्ठ, शूरप्रतापी राजे लखूजीराव जाधव यांचा या स्थळाशी संबंधित इतिहास जितका मनाला हेलावून सोडणारा आहे, उलट तितकंच हे समाधीस्थळ मनाला शांती प्रदान करणारं आहे. ही समाधी म्हणजे वास्तूकलेचा अप्रतिम नमुना आहे. वाईट वाटतं जेव्हा कळतं की, ही एकट्या लखूजीराजांची समाधी नसून संपूर्ण परिवाराची एकत्रित आणि एकाचवेळी बांधलेली समाधी आहे. तेव्हा फार वाईट वाटतं.
२५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजीराव जाधव, सोबत त्यांचे दोन सुपुत्र राजे अचलोजीराव व राजे रघोजीराव, तसेंच नातू युवराजराजे यशवंतराव म्हणजेच राजे दत्ताजीराव यांचे पुत्र या सर्वांना निजामशहाने कुटुंबासमवेत सन्मानार्थ आमंत्रित करून निशस्त्र असताना देवगिरीच्या किल्ल्यावर भरदरबारात विश्वासघाताने अतिशय निर्ममपणे खून केला होता. त्याच देवगिरीकिल्ल्यावर जो किल्ला १६०९ मध्ये खुद्द राजे लखूजीराव जाधवांनीच निजामशाहीला जिंकून दिला…तोच देवगिरी जेथे इ. स.१६१० मध्ये शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊंचा मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा संपन्न झाला होता…कित्ती वाईट नं…असो…
समाधीस्थळ अप्रतिम वास्तू आहे. दिवसा उजेडातही समाधीच्या आत मात्र काळकुट्ट अंधार असतो. त्यामुळे बारीकसारीक बघावायचे असल्यास सोबत टॉर्च आवश्यक असतो. आमचं मोबाईल टॉर्चवर भागलं…याशिवाय लक्षात असू द्या की,सायंकाळी पाच वाजेतोच तुम्ही हे स्थळ बघू शकता. आम्ही घाईघाईत बघितलंय परंतू निवांतपणे बघण्याजोगं हे ठिकाण आहे.
– नमिताप्रशांत