एक गुढी उभारू स्नेह, आपुलकी आणि विश्वासाची – धनंजय मुंडे

गुढीपाडव्याच्या निमित्ताने धनंजय मुंडेंच्या बीड जिल्हा वासीयांना खास शुभेच्छा!

बीड/परळी वैद्यनाथ -एम एन सी न्यूज नेटवर्क (दि. 08) – एकीकडे राज्यात व विशेषकरून आपल्या बीड जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. या परिस्थितीत हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडव्याचा सण आपण साजरा करत आहोत, त्यात सर्वत्र लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. अशात सणाच्या उत्साहाबरोबरच आपले स्नेह बंध जोपासत, सर्वांप्रति आपुलकी व विश्वास निर्माण करणारी एक गुढी यंदा उभारू; अशा शब्दात राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडव्याचा आज सण आहे. आनंद, स्नेह, आपुलकी वृद्धिंगत करणारा व सामाजिक ऐक्याची जपणूक करणारा हा सण साजरा करताना सर्वांनाच त्यात संमिलीत करून घेऊ, असा संदेश धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

दरम्यान, गुढीपाडव्याच्या नंतर दोनच दिवसात रमजान ईदचेही पर्व सबंध जगभरात मुस्लिम समाज साजरे करणार आहे, तेव्हा सामाजिक सलोखा व बंधुभाव जपण्याची ही दुहेरी संधी असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.