अवकाळी पाऊस/गारपीट/नुकसान
🔺धारूर तालुक्यातील डाळिंब, आंबा, मिरची, टोमॅटो आदी पिकांच्या अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी
बीड/धारूर (दि.12) – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या घाईत वेळ काढून धारूर तालुक्यातील चोरंबा, सोनीमोहा, आंबेवडगाव आदी गावांना भेटी देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या आंबा, डाळिंब, मिरची, टोमॅटो आदी पिकांची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांना धीर दिला.
अवकाळीने फळांची व भाज्यांची पडझड झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याचे अहवाल राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत, अशा सूचना यावेळी धनंजय मुंडे यांनी केल्या.
मागील दोन तीन दिवसात सातत्याने बीड जिल्ह्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळे आंबा, डाळिंब, यांसह मिरची, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी पंचनामे झाले आहेत, तर उर्वरित ठिकाणचे पंचनामे तातडीने पूर्ण केले जावेत व मदतीचे अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी फळपिकविमा भरलेला आहे त्यांनी नुकसानीचे रिपोर्ट संबंधित कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत जेणेकरून शेतकऱ्यांना दुहेरी मदत होईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
यावेळी रमेशराव आडसकर, जयसिंह सोळंके, माधवतात्या निर्मळ, हारूनभाई इनामदार, राम कुलकर्णी, महादेव शिनगारे, नितीन शिनगारे, महादेव तोंडे, हनुमंत नागरगोजे, सुदाम बडे, प्रताप चव्हाण, संदीपान तोंडे, सुग्रीव मुंडे, सतीश बडे, रमेश मुंडे, प्रवीण शेटे, बी. एस. घोळवे, गणेश बडे, प्रसाद डापकर, तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी, यांसह शेतकरी बांधव उपस्थित होते.