लोकसभा निवडणुक प्रथम कर्मचारी प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न

🔶 लोकसभा निवडणूक/२०२४/ प्रशिक्षण

◆ प्रशिक्षनात मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती.

बीड/परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क– बीड लोकसभा मतदार संघाअंतर्गत परळी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र अंतर्गत असलेल्या नियुक्त क्षेत्रीय अधिकारी, समन्वय अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख व सहाय्यक मतदान अधिकारी कर्मचारी यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीबाबत परळी येथील येथील हालगे गार्डन या ठिकाणी प्रथम प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न झाले.यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथील अधिकारी व महसूल विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

बीड लोकसभा मतदार संघ ( 39 ) च्या लोकसभा निवडणुक पार्श्वभूमीवर शुक्रवार दि 12 रोजी सर्वच कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण संपन्न झाले.अधिकारी व कर्मचारी यांची संख्या लक्षात घेता कोणत्याही प्रकारचा विस्कळीतपणा न येता सुलभ पद्धतीने प्रशिक्षण संपन्न व्हावे यासाठी प्रशिक्षण सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात संपन्न झाले.सकाळच्या सत्रात 782 तर दुपार सत्रात
785 कर्मचारी यांना हे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणाची सुरुवात ही राष्ट्रगीताने करण्यात आली तदनंतर मा.जिल्हाधिकारी दीपा मुधोल-मुंडे यांचा या प्रशिक्षणास उद्बोधन करणारा शुभेच्छा संदेश व मार्गदर्शन करणारा शुभेच्छा संदेश दाखवण्यात आला.या प्रसंगी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी लाटकर यांनी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांची मतदानाच्या आदल्या दिवशी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचे कर्तव्य व अधिकार याबाबत माहिती दिली. कामकाज करताना होणाऱ्या चुका टाळण्याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे सर्वांनीच पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले तर तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी नियुक्त कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पाडतात गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणीही प्रशिक्षण व प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिक टाळू नये. मतदान प्रक्रिया ही निष्पक्ष व खुल्या वातावरणात पार पाडण्यात येऊन मतदान करणाऱ्या मतदाराला केंद्रस्थानी मानून आपले राष्ट्रीय कर्तव्य प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडावे, असे आवाहन केले.

प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदान यंत्र, व्हीव्ही पॅड मशीन याचे प्रात्यक्षिक पाहून मतदान यंत्रे स्वतः हाताळनी करून पहिली.या प्रशिक्षणाच्या प्रस्ताविकातून नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी निकोप आणि आंनददायी वातावरणात राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन गोपनीयता भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचे सांगितले.