सिंदखेडच्या इतिहासातील “रंगमहाल”

🔶 पर्यटन /भ्रमंती/ ऐतिहासिक वास्तू/ इतिहास/ पुरातन बांधकाम शैली /

🔸रंग महाल
बुलढाणा-सिंदखेडराजा– सिंदखेडच्या इतिहासातील “रंगमहाल” ही वास्तू देखील स्वतःची अशी स्वतंत्र आणि महत्वपूर्ण ओळख जपणारी वास्तू आहे. लहानपणी जिजाऊंनी येथेच कित्येकदा आपले सणवार, विशेष म्हणजे होळी आणि रंगपंचमी साजरी केलेली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे पाने वाचतांना आपल्याला कित्येकदा ऐकायला मिळालेली गोष्ट म्हणजे, राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजे भोसले यांचा विवाह कसा जुळून आला? या प्रश्नाचा आणि या विवाहानंतर रंगरुपाला आलेल्या महाराष्ट्राच्या सुवर्ण इतिहासाचा हा रंगमहाल खरा साक्षीदार…एकदा रंगपंचमीच्या सणाला जिजाऊ आणि शहाजीराजे एकमेकांना रंग लावीत असतांना ” जोडा कसा शोभून दिसतोय ” असं लखूजीराजे जाधव (जिजाऊचे वडील) म्हणताच… “मग फोडून टाका की सुपारी ” असं मालोजीराजे भोसल्यांनी म्हणजेच शहाजी राजांच्या वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले. हा काही योगायोग अथवा संयोग नव्हे तर खुद्द परमात्म्याने दिलेली आज्ञाच असावी.

असं म्हणतात, की राजवाड्याच्या रानी महालाचीच छोटी प्रतिकृती म्हणजे रंगमहाल होय. रंग महालातील बांधकाम संपूर्ण विटांचे असून चौथरा दगडी आहे. येथील लाकडी खांब व त्यावरील कोरीवकाम आत्ताही काही अंशी बघायला मिळते मात्र जेव्हा हे कळतं, की येथे पूर्वी या लाकडी खांबांवर आणि छतावर हस्तीदंत व त्यावर सोन्याने केलेली नक्षी होती. तेव्हा या लहानश्या पण सुंदर अशा वास्तूची कल्पनाही करवत नाही. सुंदरच… अर्थातच रंगमहाल म्हणजे लखूजीराजे जाधवांची न्याय कचेरीदेखील असल्याचे सांगितले जाते..येथे उत्सव आणि सणवारही साजरे होत असत त्यामुळे येथे राजेंरजवाड्यांचा, सरदारांचा राबता रहात असेलच…
विशेष म्हणजे, या रंगमहालात इतर खोल्यांसोबतच एकाठिकाणी तेव्हाच्या पद्धतीची अटॅच टॉयलेट बाथरूम असलेली अशीही एक खोली पाहायला मिळते. तसेंच या रंगमहालाच्या टेरेसचीही गंमत आहे, ते सलग नसून प्रत्येक भागावरील टेरेस वेगळे आहे आणि एका टेरेसवरून दुसऱ्या टेरेसवर जाता येणार नाही अशी मधोमध भिंत टाकलेली आहे. दुसऱ्या टेरेसवर जावयाचे असल्यास खाली उतरूनच पुन्हा वर जावे लागते… या रचनेमागे विशेष असे कारण असेलच… प्रश्नच नाही.. असो, “रंगमहाल” एक सुंदर वास्तू आहे.

– नमिताप्रशांत 🌿