नागपूर विभागातील शाळा १ जुलैला सुरू होणार

उन्हाळी सुट्ट्या 🔺राज्यातील सर्व शाळांना २ मेपासून सुटी जाहीर 🔺 १५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष

पुणे- एम एन सी न्यूज नेटवर्क : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना गुरुवार, दि. २ मे पासून सुटी जाहीर करण्यात आली आहे, तसेच विदर्भातील जिल्हे वगळता शनिवार, दि. १५ जून रोजी राज्य मंडळाच्या सर्व विभागातील शाळा भरविण्यात येणार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे ही माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास, अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असेही परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विदर्भ वगळता, इतर सर्व विभागांतील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार, दि. १५ जून, २०२४ रोजी पुढील शैक्षणिक वर्षासाठी सुरू करण्यात याव्यात, अशा सूचना केल्या आहेत.

🔷 विदर्भातील जून महिन्यातील तापमान विचारात घेता, उन्हाळ्याच्या सुटीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा १ जुलैपासून सुरू कराव्यात, असे परिपत्रकात नमूद केले आहे.