३५ जण घेणार जैन धर्माची दीक्षा; दीक्षा घेणाऱ्यांत विद्यार्थी, व्यापारी

🔶 धार्मिक /धर्म परंपरा

गुजरात : अहमदाबाद :  गुजरात आणि महाराष्ट्रातील जैन समुदायातील सदस्यांसाठी पाच दिवसांचा (दि. १८ ते २२ एप्रिल) दीक्षा सोहळा गुरुवारी साबरमती नदीच्या किनारी ‘अध्यात्मा नगरी’ येथे सुरू झाला असून यात २२ एप्रिल रोजी ११ वर्षांच्या मुलासह जैन समाजातील किमान ३५ जण एकत्रच जैन दीक्षा (संन्यास) घेणार आहेत.

सुरत येथील ट्रस्ट, श्री अध्यात्म परिवाराकडून जारी करण्यात आलेल्या प्रकाशनानुसार, जैन संत पूज्य आचार्य विजय योगतिलक सुरीश्वरजी महाराज यांच्याकडून ३५ जणांना सामूहिक जैन धर्माची ‘दीक्षा’ मिळणार आहे. या ३५ पैकी दहा जण १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, यामध्ये सर्वांत लहान एक ११ वर्षांचा मुलगा आहे. दीक्षा घेणाऱ्यांपैकी १३ वर्षीय सुरतचा रहिवासी हेत शाह आहे. हेतने सुमारे दोन वर्षांपूर्वी ‘उपधान तप’ हाती घेण्यासाठी शालेय शिक्षण सोडले, या तपामध्ये ४७ दिवस घरापासून दूर साधूसारखे राहावे लागते.