🔺#WorldHeritageDay/ जागतिक वारसा दिन/पर्यटन,
🔷 #कान्नवबंगला, कारंजा लाड, वाशिम. भाग – १
एकदा पुर्ण वाचाच आणि प्रत्येक फोटो बारकाईने बघा… बघा आपल्या वऱ्हाडातील श्रीमंती(माहिती – सुबोध आवारी )
वाशिम-कारंजा लाड –भारत आणि श्रीलंका तसे दोन स्वतंत्र देश, प्रशासन व्यवस्थाही स्वतंत्रच मात्र, श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांचा बंगला वऱ्हाडातील कारंज्यात हे ऐकूण कुणालाही आश्चर्य वाटेल. वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील काण्णव यांचा बंगला चक्क श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांच्या बंगल्याची प्रतिकृती आहे. नव्हे तर, श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांचा बंगला काण्णवांच्या बंगल्याची प्रतिकृती आहे. इंग्रजांनी काण्णवांनी बांधलेला काण्णव बंगला पाहून इथलेच कारागीर श्रीलंकेत नेले. आणि तेथेही असाच बंगला उभा राहिला.
श्रीलंकन व्हाईसरायचे असलेले निवासस्थान श्रीलंका स्वतंत्र झाल्यानंतर पहिले राष्ट्राध्यक्ष सिरीमाओ भंडारनायके यांचे ते शासकीय निवासस्थान ठरले. वऱ्हाड तशी सोन्याची कुऱ्हाड म्हणून ओळखले जाते. संपन्नतेचा वारसा लाभलेले वऱ्हाड त्यात कारंजा हे वैभव इतिहासात आहे. विदर्भामध्ये वाडे खूप आहेत. कारंज्यातील काण्णवांचा मात्र ‘बंगलाच’ आहे. 121 वर्षांपूर्वी सोने 17 रुपये तोळा होते. त्यावेळी हा बंगला साडेतीन लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला.
आत्ताचा सोन्याचा भाव आणि रुपयांची किंमत याची तुलना केली तर, आज या बंगल्याची काय कॉस्ट असती, याचा विचार करा. ती या बंगल्याची किंमत झाली. ही श्रीमंती लौकीकाच्या पातळीवर संपन्नता सांगायची तर या बंगल्यात संपन्नता मोजता येणार नाही.
कारंजा येथील कृष्णाजी काण्णव व्यापाराच्या निमित्ताने नेहमी मुंबईला जायायचे. तेथील ब्रिटीश व पोर्तुगीज स्थापत्य कलेच्या वास्तू पाहून ते प्रभावीत झाले. कृष्णाजींनी मग कारंज्यातही पोर्तुगीज शैलीतील बंगला बांधण्यास सुरुवात केली. 1899 साली सुरुवात केलेला हा बंगला 1903 सालापर्यंत तयार झाला. या बंगल्याच्या पाया खोदताना काळी माती असल्याने प्रत्येक आठ फुटांवर सहा इंचाचा शिसाचा थर टाकण्यात आला. त्याकाळी ब्रम्हदेशातील सागवानाचे लाकूड बांधकामासाठी सर्वोत्कृष्ट समजले जायायचे. इंग्लडच्या महारानीचा दिवानखाणा याच लाकडांनी सजला आहे.
या बंगल्याचे खांब एकसंघ बर्माटिकवूडचे आहेत. राजस्थानी कारागिरांनी बारीक नक्षी कोरून त्याला चार चांद लावले आहेत. बंगल्याचे विटा चुण्याचे बांधकाम काठेवाडी कारागिरांनी केले आहे. रंगरंगोटी मुंबई येथील प्रख्यात विठोबा पेंटर यांनी केल्याचा उल्लेख आहे. बंगल्याचे प्रवेशद्वार सभामंडपासारखे आहे. समोरचे दोन्ही नक्षीदार स्तंभ कित्येक टन वजन असलेल्या ओतीव बिडाचे आहेत. फसरबंदी त्याकाळात दुर्मीळ असलेल्या इटालियन मार्बलचे आहे.
इटालियन मार्बल वापरणारे त्या काळातील काण्णव हे एकमेव ग्रहस्थ होते. वास्तूच्या मधोमध दोन्ही दालनांना लागून 30 बाय 30 चौरस फुटाचा चौक आहे. दुसऱ्या माळ्यावर 50 बाय 40 फुटांचा दिवाणखाना आहे. ही भौतिक श्रीमंती पाहिल्यानंतर हा बंगला पाहणाऱ्यांशी बोलू लागतो. या बंगल्याची कलौकीक संपन्नता डोळे दिपवणारी आहे.दिवाणखाना आहे. ही भौतिक श्रीमंती पाहिल्यानंतर हा बंगला पाहणाऱ्यांशी बोलू लागतो. या बंगल्याची कलौकीक संपन्नता डोळे दिपवणारी आहे. दिवाणखान्यातील प्रसन्नता रोमारोमांत भिनली जाते. या दिवाणखान्यात कधीकाळी लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर बसले होते. याच दिवाणखान्यात कधी सतारीचे स्वर दरवळले. कुणाचा षड्ज ऐकू आला तर कधी बालगंधर्वाचे नाट्यपद निनादून गेले. मास्टर दिनानाथांचा मालकंस रुनझुनला, बालगंधर्व, भाटेबुवा, शिरगोपीकर यांच्या खास मैफीली याच बंगल्यात रंगल्या. हिराबाई बडोदेकर, पंडित नारायण व्यास, जगन्नाथबुवा पंढरपूरकर, मनोहर बर्वे, केशवराव भोळे, पंडित दिनानाथ मंगेशकर यांचे स्वरही या दिवाणखान्याने अनुभवले. लता मंगेशकरांची बाळपावले याच बंगल्यात दुडदुडली. दिनानाथ मंगेशकर यांची कंपनी कारंज्यात आली असताना काण्णवांकडे गाण्याची मैफल झाली. लहानगी लता दिनानाथांचे बोट धरून बंगलाभर फिरली. आणि थकून झोपी गेली. किर्तन महोत्सवामध्ये घोंगडेबुवा महाराज, कराडकर, कोल्हटकर, पाठक, हिरवळकर, आयाचीतकर, निजामपूरकर, भालेराव, कुळकर्णीबुवा इत्यादी प्रसिद्ध किर्तनकारांची किर्तने या बंगल्याच झाली. केशवराव भोळ्यांसारखा मराठी संगीतातील तालेवार गायकांची मैफलही इथे सजली. प्रत्येक मैफीलीनंतर काण्णवांकडे वऱ्हाडी परंपरेनुसार पुरणपोळ्यांची पंगत असायची. एकदा केशवराव भोळ्यांसाठी मसाल्याची आमटी (सार) बनविली. केशवरावांना ती एवढी आवडली की ते चक्क दहा वाट्या आमटी प्यायले. परिणामी, घसा खराब होऊन रात्रीची मैफल रद्द करावी लागल्याचा उल्लेख खुद्द केशवरावांनी एका दिवाळी अंकात केला होता. या बंगल्याच्या आधी काण्णवांच्या पूर्वजांनी 28 एप्रिल 1876 रोजी कारंजा येथे राममंदिर बांधल्याची नोंद आहे.
आत्ता वळू श्रीलंकेकडे
कृष्णाजी काण्णव यांनी हा बंगला बांधला तेव्हा तो काळ इंग्रज आमदणीचा होता. त्यात कारंजा पुरातन काळापासून मोठी व्यापारी पेठ म्हणून ओळखले जात होते. शिवाजी महाराजांनी गुजरातेतील सुरत हे शहर लुटले होते. हे त्या शहराची श्रीमंती अधोरेखीत करण्यासाठी सांगितले जाते. मात्र, महाराजांनी मोगलांचे महत्त्वाचे व्यापारीठाणे असलेले कारंजा देखील दोनवेळा लुटल्याची ऐतिहासीक नोंद आहे. या शहराची गरिमा संपन्न आहे. वऱ्हाडातील कापसाची उलाढाल कारंज्यातून होते. ब्रम्हदेश, चीन, श्रीलंका, आखाती देश ते पार इंग्लंडपर्यंत कारंज्यातील कापूस जात होता. या व्यापारातून अनेक व्यापारी शहरात आले. मूळचे फलटणचे असलेले काण्णव देखील कापसाच्या व्यापारासाठी कारंजात आले. आणि इथल्या मातीत रमले. कृष्णराव काण्णवांनी हा बंगला बांधल्यानंतर या बंगल्याची महती पार सातासमुद्रापार गेली.
इंग्रज राजवटीत श्रीलंका व भारत हे दोन्ही देश असल्याने श्रीलंकन व्हाईसरायच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी तत्कालीन वऱ्हाड प्रांताच्या इंग्रजांच्या कारभाऱ्यांनी ही बाब मुंबई प्रांताच्या गव्हर्रनरच्या कानी घातली. सरकारी सुत्र फिरली. काण्णवांच्या बंगल्याचे बांधकाम करणारे कारागीर जहाजाने तत्कालीन सिलोनला नेले गेले. तेथे या बंगल्याची प्रतिकृती उभी राहिली. व्हाईसराय हाऊस म्हणून ओळखले जाणारे हे निवासस्थान श्रीलंका स्वतंत्र झाल्यानंतर तिथले पहिले राष्ट्राध्यक्ष सिरीमाओ भंडारनायके यांचे शासकीय निवासस्थान झाले.
(माहिती – सुबोध आवारी, गुगल साभार )