मुंडे बंधू -भगिनी एकत्र आल्याने राज्याची राजकीय समीकरणे बदलली

लोकसभा  2024 / सत्ता संघर्ष 

बीड:– बीड लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात राजकारण उन्हाचा पारा जसा वाढत आहे. तसे-तसे राजकारणही तापत चाललं आहे. त्यातच जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात थोडासा गारवा आला आहे. बीड लोकसभेसाठी भाजपा नेत्या पंकजा मुंडे या महायुती कडून निवडणुकीत उभ्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सोनवणे हे दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. तर वंचित बहुजन आघाडी कडून वंचित चे बीड जिल्हाध्यक्ष अशोक हिंगे हे मैदानात उतरले आहेत. एकंदरीत लोकसभेच्या निवडणूकित खरी लढत जरी पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यात होत असली तरी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व बीड विधानसभेचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष संदिप क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बीड लोकसभा मतदारसंघ व परळी विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या सबंध महाराष्ट्राच्या नजरा वळणारा आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. सन 2009 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे यांना 5 लाख 53 हजार 994 मते मिळवून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश आडसकर यांचा 1 लाख 40 हजार 952 मतांनी पराभव केला होता. तर 2014 च्या निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे यांना 6 लाख 35 हजार 995 मते मिळाली होती. त्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश धस यांचा 1 लाख 36 हजार 454 मतांनी पराभव केला होता. मात्र स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम ताई मुंडे यांनी नऊ लाख 16 हजार 920 मते घेऊन ऐतिहासिक विजय मिळविला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार दिला नव्हता.

परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यात गाजला होता. तो भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्यातील सत्तासंघर्षामुळे. गत लोकसभा निवडणुकीतही परळी विधानसभा मतदारसंघातून खा. डॉ. प्रीतम ताई मुंडे यांना भरघोस मते मिळाली होती. मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी मुंडे भगिनी समोर आव्हान उभे केले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष फुटी नंतर बीड जिल्ह्यातील तसेच सर्वच विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. परळी आ. धनंजय मुंडे , माजलगाव आ. प्रकाश सोळंके, आष्टी आ. बाळासाहेब आजबे हे शरदचंद्र पवार यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाले. तर गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आ. लक्ष्मण पवार व केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांच्या रूपाने भाजपाच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा आ. संदीप क्षीरसागर यांच्या रूपाने बीड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ताब्यात आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघात सद्यस्थितीला महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात असली तरी शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार या जिल्ह्यात आहे. हे नाकारता येणार नाही. त्यामुळे कोणत्या विधानसभा मतदारसंघातून कोणाला मताधिक्य मिळणार? तरुण व नव मतदार कोणाला पसंती देणार? याकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत.