बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे दाखल करणार उमेदवारी अर्ज

बीड लोकसभा निवडणूक २०२४

🔶 महापुरुषांना अभिवादन करून माने कॉम्प्लेक्सला होणार विजयी संकल्प सभा*

बीड ।दिनांक २३।- भाजप,महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे या उद्या २४ तारखेला दुपारी उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करणार आहेत. महायुतीच्या फायरब्रँड नेत्या पंकजाताई मुंडे यांचे ‘होमपीच’ असलेल्या बीड शहरात त्यांच्या स्वागतासाठी भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून आज दुपारी तीन वाजता अभूतपूर्व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होणाऱ्या या रॅलीचा समारोप नगर रोड जवळील माने कॉम्प्लेक्स येथे मैदानावर होईल. यादरम्यान पंकजाताई मुंडे महापुरुषांना अभिवादन करत सभास्थळी पोहोचतील.त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांच्यासह मान्यवर नेते सभेला संबोधित करणार आहेत.

पंकजाताई मुंडे या आज बीड लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याने भाजपसह महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. राज्याच्या विविध भागातील महायुती उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणाऱ्या पंकजाताई मुंडे उद्या स्वतःचा अर्ज दाखल करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजाताईंचे बीड नगरीत भव्य स्वागत करण्यासाठी आणि आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी भाजप-महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार अभूतपूर्व रॅली काढणार असून या रॅलीत स्वतः पंकजाताई मुंडे व भाजपचे नेते सहभागी होणार आहेत. रॅलीत हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजप महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी पंकजाताई मुंडे यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिलेली आहे. उद्या दुपारी ३ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून रॅलीत सहभागी होत पारस ग्राऊंड, माने कॉम्पलेक्स येथे होणाऱ्या सभेला त्या संबोधित करणार आहेत. दरम्यान कार्यकर्त्यांनी शिस्तीचे पालन करावे.