विरोधी उमेदवार बहुरंगी; जातीधर्माच्या नव्हे तर विकासाच्या मुद्यावर जिल्हा सुजलाम-सुफलाम करण्यासाठी पंकजाताईंना बहुमताने विजयी करा-धनंजय मुंडे

🔶जिल्ह्यातील जनता हेच माझे वैभव;अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले

🔶 पाच वर्षांसाठी एक संधी द्या, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार ; अधुरे स्वप्न साकार करण्यासाठी मतरुपी आशीर्वाद द्या -पंकजाताई मुंडेंचे बीडच्या जाहीर सभेत आवाहन

🔶 बीडच्या विराट सभेत महायुतीच्या एकजुटीचे दर्शन

जिल्ह्यात सात लाख हेक्टर जमीन जिरायत आहे, म्हणून बीड जिल्ह्यातील लोक ऊसतोडायला जातात. मनगटात ताकद पण शेतात पाणी नसल्यामुळे या जिल्ह्यातील लोक दुसर्‍याच्या शेतात कामाला जातात हे चित्र बदलायच.

बीड । दि. २४।-नि:स्वार्थ प्रेम करणारी जनता माझ्यासोबत आहे. जिल्ह्यातील सर्व जनता हेच माझे वैभव आहे, मात्र कांही जणांची दृष्ट याला लागते. निवडणूकीत गाफील राहू नका. मी एका पराभवाला सामोरे गेले आहे. पराभवानंतर जनतेच्या साक्षीने मी समाजकारणात राहिले.अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले, त्यानंतर आता मला संधी मिळाली आहे. ही निवडणूक अवघड आहे. मी म्हणजे गोपीनाथ मुंडे असे म्हणणार नाही, कारण ज्या दिवशी मुंडे साहेबांच्या गळ्यात हार घालायचा होता, त्याचवेळी त्यांचेवर अंत्यसंस्कार करायची वेळ आली. त्यामुळे आपले त्यांचे अधुरे राहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी या लोकसभेत आपल्याला विजयी व्हायचे आहे. आपल्याला एकदा दूध पोळले आहे, आता ताकही फुंकून प्यायचे, म्हणून गावागावात जा, प्रचार करा, जिल्ह्याला विकासाच्या उंचीवर घेवून जाण्यासाठी मला अधिकाधिक मताधिक्य देवून विजयी करा असे आवाहन भाजपा महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी आज येथे केले.

दरम्यान,जिल्ह्यात सात लाख हेक्टर जमीन जिरायत आहे, म्हणून बीड जिल्ह्यातील लोक ऊसतोडायला जातात. मनगटात ताकद पण शेतात पाणी नसल्यामुळे या जिल्ह्यातील लोक दुसर्‍याच्या शेतात कामाला जातात. हे चित्र बदलण्यासाठी बीड जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक करत तुमच्या विकासासाठी सक्षमपणे काम करणार्‍या भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडेंना प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्या असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. स्वत:ला शेतकरी पुत्र म्हणवून घेणार्‍या आपल्या विरोधी उमेदवाराने सर्वात आधी मराठा आरक्षणाचा लाभ घेत त्या आधारे केजमध्ये लोकल निवडणूक लढवली .ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही त्याला तुम्ही निवडून देणार का? आपल्या समोरचा उमेदवार बहुरंगी आहे अशा शब्दात त्यांनी विरोधकावर सडकून टिका केली. ही लोकसभा निवडणूक मुद्दामहून जातीवर जातेय, हे चूकीचे आहे. आमची जात काढली जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमचा कोणाचा कधीच विरोध नव्हता. पंकजाताई मुंडे यांनी जात-पात-धर्माच्या पलीकडे जावून जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे जातीधर्माच्या नव्हे तर विकासाच्या मुद्यावर जिल्ह्याला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी पंकजाताईंना बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज आपला उमेदवारी दाखल केला. त्यानंतर पारस ग्राऊंडवर आयोजित महारॅलीचे रूपांतर विराट विजयी संकल्प सभेत झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. पालकमंत्री धनंजय मुंडे, खा. डॉ.प्रीतमताई मुंडे, आ.प्रकाश सोळंके,आ.सुरेश धस, आ.बाळासाहेब आजबे, आ.लक्ष्मण पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ.अमरसिंह पंडीत यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, यश:श्री मुंडे, अक्षय मुंदडा, योखेश क्षीरसागर आदींसह महायुतीच्या घटकपक्षांचे नेते, जिल्हाप्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले. आजची ही सभा पंकजाताई मुंडे यांच्या विजयाची नांदी आहे. पंकजाताई केवळ खासदार म्हणून निवडून येणार नाही तर केंद्रीय मंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्तेत असताना पंकजाताईंनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे काम केले. त्यामुळे या निवडणूकीत जाती-पातीचे राजकारण करणार्‍यांना उत्तर देवून विकासाच्या मुद्यावर आपल्या सर्वांना पंकजाताईंना निवडून द्यायचे आहे असे आवाहन त्यांनी केले.

सभेच्या प्रारंभी बाळासाहेब दोडतले, कल्याण आखाडे, मनसे जिल्हाध्यक्ष सुंमत धस, प्रा.पी.टी.चव्हाण,सलीम जहाँगीर, अनिल जगताप, अनिल तुरुकमारे, विजयसिंह पंडीत, माजी आ.भीमराव धोंडे, रमेश आडसकर, आ.बाळासाहेब आजवे, आ.लक्ष्मण पवार, आ. प्रकाश सोळंके, आ.सुरेश धस, खा.डॉ. प्रितम मुंडे यांची समयोचित भाषणे झाली.

याप्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या,माझा बाप भरल्या ताटावरुन गेला, तेव्हा तुम्ही सर्व जनता सर्व माझे आधार झालात. त्यामुळेच तुम्ही मला प्रिय आहेत. माझ्यावर खूप लोकांचे स्वप्न साकारण्याची जबाबदारी होती. धनंजय मुंडेंनी आता स्पष्ट करुन टाकलयं की, जिल्ह्याचा अन् घरातला पालक म्हणून पंकजाताईंच्या विजयाची जबाबदारी घेतली हे खूप आनंददायी आहे. मी पालकमंत्री असताना विकासाच्या शक्य होईल त्या प्रत्येक योजना अनेक ठिकाणी मंजूर केल्या. शासनाकडून विकासांचा कोट्यावधी रुपयांचा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी आणला. माझी नियती स्पष्ट आहे, मन कलुषित नाही, त्यामुळे मागच्या निवडणूकीत आवाहन केल्यानंतर जनतेने प्रितमताईला प्रचंड मते दिली होती. आता माझ्यासाठी मते मागत आहे, मला शेवटची संधी द्या, सर्व जाती-धर्माच्या समाज बांधवांना माझे आवाहन आहे, मला पैसे कमवायचे नाहीत की, प्रसिध्दी मिळवायची नाही तर केवळ जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे.

ही निवडणूक देशाची : जिल्हयाच्या विकासाची
——
घडी गेली की, पिढी जाते, पाच वर्ष मी घरी बसले, मी तुमच्यासाठी तळतळले आहे. ही निवडणूक देशाची आहे. बीड जिल्हा जातीधर्माच्या नव्हे तर विकासाच्या कायम पाठीशी राहतो असा संदेश जनतेने या निवडणूकीतून द्यावा. देशाची धूरा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सोपवण्यासाठी विश्वासाने मला बीडचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्या, तुमच्या मताआधारे जिल्ह्याचा विकास करुन मी तुमचे मतरुपी कर्जाची परतफेड करेन असा विश्वासही पंकजाताईंनी हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला दिला. बीड जिल्ह्यातील जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबध्द असेन. मी दिलेला शब्द पाळते, त्यामुळे मला सन्मानाने दिल्लीला पाठवण्यासाठी प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा असे आवाहनही पंकजाताई मुंडे यांनी केले.

🔺धनंजय मुंडे
देशाची सुत्रे पुन्हा कोणाच्या हाती सोपवायची हे ठरवणारी ही निवडणूक आहे. धनगर, माहेश्वरी, तेली, मराठा असो की वंजारी या सर्व जाती-धर्माच्या उमेदवारांना खासदार म्हणून निवडून दिले. जिल्ह्याचा पालकमंत्री अन् घरातला पालक म्हणून मला पंकजाताईला निवडून आणण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे प्रितमताईंना जरी ही निवडणूक पाहून मोकळं अन् हलक-हलक वाटत असेल तितकं मला वाटत नाही. जिल्ह्यातील जनतेने इतिहासात कधीच कोणाही उमेदवाराची जात-पात-धर्म न पाहता केवळ त्या व्यक्तीची कर्तबगारी पाहून संसदेत पाठवले. आज आता तीच वेळ आली आहे. त्यामुळे पंकजाताईचे सक्षम नेतृत्व आपल्या सर्वांसमोर आहे.दुसरीकडे आपल्या समोरचा उमेदवार बहुरंगी आहे. त्यांच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील बीडला आले, पण उमेदवारी अर्ज दाखल करायला आत आले नाहीत, कारण त्यांना माहित आहे, हा बजरंग माझ्या लहान बहिणीच्याविरोधात पराभूत झाला आहे, आता तर मोठी बहिण पंकजाताईंच्या विरोधात हे निवडणूक लढवत आहेत. मग त्यांचा निभाव लागेल का? असा प्रश्न त्यांना पडला असावा. बहुरंगीला शिवरायांसमोर शपथ घ्यावी लागली की, मी मॅनेज उमेदवार नाही. याचा अर्थ काय? असा सवाल करत धनंजय मुंडे म्हणाले बजरंग सोनवणेंनी खोटी शपथ घेतली. वास्तविक अशी शपथ घ्यायची त्यांना गरज का पडली, हा खरा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. शेतकरी पुत्र म्हणून घेणार्‍या सोनवणेंनी मराठा आरक्षणाचा सर्वात आधी लाभ घेतला हे सांगताना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी 2019 चा शासन निर्णय उपस्थितांना दाखवत बजरंग सोनवणेंचे कुणबी प्रमाणपत्रही त्यांनी दाखवले. 14 जानेवारीला त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले. नंतर त्यांनी याच प्रमाणपत्राधारे केजच्या निवडणूकीत अर्ज भरला. असे सांगत बजरंग सोनवणे यांचा बुरखा टराटरा फाडला. हे उमेदवार कधी लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर आंदोलनाला बसले का? हे काय जिल्ह्यातील जनतेचे भले करणार का? असा सवाल केला. दुसरीकडे पंकजाताई मुंडे यांनी जात-पात-धर्माच्या पलीकडे जावून जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले. त्यामुळे जिल्हा सुजलाम-सुफलाम करण्यासाठी पंकजाताईंना प्रचंड मतांनी विजयी करा.

🔺रमेश आडसकरांनी गाजवले भाषण!
यावेळी भाजप नेते रमेश आडसकरांनी आपल्या भाषणात मविआचे उमेदवार बजरंग सोनवणेंवर शेलक्या शब्दात टिका केली. ‘समोरच्या उमेदवाराला माझे सांगणे आहे,वेळ गेलेली नाही, अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. कारण मी, आ.सुरेश धस यांनीही लोकसभा निवडणूक मुंडे साहेबांविरुध्द लढलो, आमचा निभाव लागला नाही. तरीही बजरंग सोनवणेंना हे का कळलं नाही’ असे सांगत जुन्या राष्ट्रवादीने मुद्दाम त्यांना उमेदवारी दिली असा उपरोधिक टोलाही रमेश आडसकरांनी लगावला. आडसकरांच्या या भाषणा उपस्थितांनी प्रचंड टाळ्या देत प्रतिसाद दिला.

🔺आ.बाळासाहेब आजबे
महायुती भक्कमपणे बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी आहे. पंकजाताई मुंडे या दिल्लीत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना जिल्हा विकासाच्या उंचीवर नेवून ठेवतील हा विश्वास सर्वांना आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेने आरक्षणाच्या मुद्यावरुन विरोधकांकडून केला जात असलेला बुध्दीभेद ओळखावा. वास्तविक राज्य सरकारने मराठा समाजाला विधानसभेत विशेष अधिवेशन घेवून 10 टक्के आरक्षण दिलेले आहे. ते आरक्षण न्यायालयातसुध्दा टिकावे यासाठी अभ्यासू अहवालही तयार केलेला आहे. म्हणून मराठा समाजानेही विरोधकांच्या चूकीच्या भूलथापांना बळी न पडता पंकजाताईंना बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्य द्यावे.

लक्ष्मण पवार
जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. त्यांना आपला विकास कोण करु शकते, हे चांगले माहित आहे. त्यामुळे पंकजाताईंना प्रचंड मताधिक्क्याने निवडून देण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेवून येत्या 13 तारखेला पंकजाताईंना विजयी करत दिल्लीत संसदेत बीड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करायला पाठवावे असे आवाहन गेवराई मतदार संघाचे आ.लक्ष्मण पवार यांनी केले.

आ.प्रकाश सोळंके
जिल्हा विकसित करण्यासाठी, तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी आपल्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना सर्व जिल्ह्यातील मतदारांनी मतदान करुन विजयी करावे. आपण इतके दिवस एकमेकांच्या विरोधात निवडणूका लढवल्या, मात्र आता आपली महायुती झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी जिंकून देत पंकजाताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. भविष्यातील काही मिळायचे असेल तर ते महायुतीतूनच मिळेल त्यामुळे आपल्या राजकीय महत्वाकांक्षेला आवर घाला. संपूर्ण देशातून पंकजाताई मुंडे सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येतील. बीड जिल्ह्यात, ब्राह्मण, वाणी,तेली समाजाचे उमेदवार खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. म्हणजेच जिल्ह्यात अजूनही जातीपातीच्या राजकारणाला थारा मिळालेला नाही हे लक्षात घेवून जनतेने मतदान करावे असे आवाहन आ.प्रकाश सोळंके यांनी केले.

आ.सुरेश धस
आ.प्रकादादा आता पुढचा काहीच विचार करायचा नाही. यापुढे आता या महायुतीतील कोण कोणत्या चिन्हावर लढेल हे काहीच आता सांगता येत नाही. इतकी सारी राजकीय स्थिती बदललेली आहे असे सांगत आ.सुरेश धस यांनी उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकवला. उद्या जे व्हायचं ते होईल पण आता मात्र आपल्या सर्वांना पंकजाताईंना एकदिलाने निवडून आणायचे आहे. अब की बार चारसो पार असे भाजपने सांगितल्यानंतर काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षाने अबकी बार पाचसो पार असे म्हणावं, मात्र त्यांची अवस्था केविलवाणी झालेली आहे, मात्र आम्ही चारसो पार म्हटलं की, विरोधक मुस्लिम समाजात सीएएवरुन चूकीचे गैरसमज पसरवतात. संविधान बदलणार म्हणून आमच्या विरोधात चूकीचे वक्तव्य ते करतात. मात्र घटना कोणीच बदलू शकत नाही. आमच्या विरोधकांना जनता चांगले ओळखते. वास्तविक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व घटकांचा विकास केला. गरिबांना न्याय दिला आहे हे सांगताना आ.धस यांनी महाविकास आघाडी सरकारने अभिनेत्री कंगणा राणावत, केंद्रिय मंत्री नारायण राणे, टीव्ही पत्रकारांचा सत्तेचा गैरवापर करुन केलेला छळ उपस्थितांसमोर मांडला. दोन हॉर्वेस्टरचे मालक शेतकरी पुत्र कसे? असा सवाल करत त्यांनी बजरंग सोनवणेंवर टिका केली. भाजप सरकारमध्ये मंत्री असताना पंकजाताईंनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केलेली रस्त्यांची कामे, तांड्यापर्यंत दिलेल्या सुविधा, महिला व मुलींच्या कल्याणाच्या राबवलेल्या योजना अन् मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी राबवलेल्या योजनांचा आढावा घेत विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करुन संसदेत पाठवण्याचे आवाहन केले.

खा.डॉ.प्रितमताई मुंडे
ही आजची सभा खर्‍या अर्थाने विजयाची सभा आहे. पंकजाताईंनी पालकमंत्री असताना जिल्ह्यासाठी किती विकास कामे केली हे मी सांगणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. मला सांगा, भारत देश जगात तिसरी महासत्ता होतोय, यासाठी नव्हे तर आमच्या लाडक्या पंकजाताईंना त्यांच्या योग्यतेच्या पदावर पुन्हा बसवण्यासाठी तुम्हाला ही निवडणूक महत्वाची वाटते हे मला चांगले माहित आहे. मला माहिती आहे, संपूर्ण राज्यभरातून आज लोकं इथे आले आहेत, त्यामुळे ही खर्‍या अर्थाने विजयाची सभा मी मानते. पंकजाताईंना तुम्हा सर्वांचे मतरुपी आशिर्वाद द्या, अन् माझ्यापेक्षा जास्त विक्रमी मताधिक्याने निवडून द्या. तुमच्यापैकी कोणालाही पंकजाताईंकडे कामे घेवून जाताना फार विनंत्या कराव्या लागल्या नाही. पंकजाताईंनी बोलावून घेत गाव विकासासाठी निधी दिला. त्यामुळे ताईंनी जे विकासाचे योगदान दिले त्याची परतफेड करण्यासाठी आपण कोणीही कमी पडू नये. हे तेच मैदान आहे जिथे 2019 मध्ये मी भाषण केले होते. मात्र मी कोणावरही टिका करत नाही. 2019 ला साहेबांच्या बारकीला तुम्ही विजयी केले. आता या निवडणूकीत तुम्ही साहेबांच्या मोठीला मोठ्या मताधिक्याने विजयी करा. दिग्गज नेते आपल्या सोबत आहेत. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदार संघातून 20 हजारांची जरी वाढीव मताधिक्य दिले तर आपल्या पंकजाताई 5 लाखांच्या मताधिक्क्याने सहज विजयी होतील असा विश्वासही खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला.
••••