महिला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीचा मेळावा संपन्न

बीड /परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क – शहरातील महिला महाविद्यालयात माजी विद्यार्थिनी मेळावा  आयोजित करण्यात आला . या विद्यार्थिनी मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा . प्रसादजी देशमुख उपस्थित होते तर अध्यक्षा म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . विद्याताई देशपांडे या उपस्थित होत्या. या मेळाव्यात महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी समितीच्या अध्यक्षा मधुरा कुलकर्णी , सचिव – स्वाती भोसले यांची व तसेच माजी विद्यार्थिनी समितीच्या सदस्या असलेल्या अनेक विद्यार्थिनींची देखील उपस्थिती होती.

या मेळाव्याच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचे व माजी विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले . त्यानंतर आपल्या प्रास्ताविकपर भाषणात प्रा.डॉ. विवेकानंद कवडे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्या व त्यांची कार्ये काय असतात याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर स्वतःचे अनुभव देखील त्यांनी मांडले. यानंतर माजी विद्यार्थिनी समितीच्या अध्यक्षा मधुरा कुलकर्णी आणि समितीच्या सचिव स्वाती भोसले या दोघींनीही याप्रसंगी आपले मनोगत  मांडताना आपण सर्वतोपरी महाविद्यालयाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासक उद्गार काढले . महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु.दीपाली मुळे हिने महाविद्यालयात शिक्षण घेताना तिला आलेल्या अनुभवांना उजाळा दिला . तिला शिक्षकांनी केलेले साह्य आणि या महाविद्यालयात आलेले अनुभव याचे सविस्तर विवेचन केले.

या वेळी संस्थेचे कोषाध्यक्ष,महाविद्यालयाच्या प्राचार्या यांनी  आपल्या  मनोगतात  महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थिनींना हे महाविद्यालय सदैव सहकार्य करीत राहील आणि कधीही गरज पडली तरी महाविद्यालयाकडे या , तुम्हाला सहकार्य करायला आम्ही सदैव तत्पर आहोत.  तर प्राचार्या म्हणाल्या की हे महाविद्यालय म्हणजे तुमचे माहेरघर आहे . कधीही केव्हाही कोणत्याही अडचणी असतील तर महाविद्यालयात  या महाविद्यालय तुमच्या पाठीशी आहे .
   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . डॉ .अरुण चव्हाण यांनी केले तर आभार डॉ.नेरकर एस. एस. यांनी केले . या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  माजी विद्यार्थिनी मेळाव्याचे संयोजक प्रा.डॉ.जोशी आर. एल. व प्रा.डॉ.पाध्ये मॅडम यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. .