उन्हाचा कहर २२ दिवसांत राज्यात उष्माघाताचे १४३ रुग्ण

उन्हाचा पारा /तापमान /वातावरण /आरोग्य 

मुंबई : नुकताच पुन्हा तीन-चार  दिवस उष्णतेची लाट असण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उन्हाचा पारा वाढला असून, यामुळे उष्णताही प्रचंड वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसांत उष्णतेची एक लाट येऊन गेली होती. पारा सातत्याने वाढत असल्याने उष्माघाताच्या रुग्णांची संख्यादेखील वाढू लागली आहे. राज्यात मार्चपासून आतापर्यंत १८४ रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी १४३ रुग्ण गेल्या २२ दिवसांतील आहेत. मात्र अद्याप मुंबईतसह उपनगरात एकही रूग्ण आढळलेला नाही. परंतु, संभाव्य धोका विचारात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

१ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ४१ होती. मात्र ५ एप्रिल ते २६ एप्रिल या २२ दिवसांच्या कालावधीत १४३ रूग्णांची नोंद झालेली असून एकूण रूग्णसंख्या १८४ वर गेली आहे. यापैकी सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यात आढळले आहेत. त्यानंतर ठाणे १९, नाशिक १७, वर्धा १६, बुलढाणा १५, तर सातारा येथे १४ रुग्णांची नोंद झाली आहे.