धार्मिक /अध्यात्म /परमेश्वर चिंतन
देवांच्या अस्तित्वाच्या, कृपाछायेच्या खुणा जिथे उमटलेल्या आहेत आणि साधूसंत, ऋषी-तपस्वी यांच्या वास्तव्याने पावन झालेला परिसर म्हणजे नगर बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेला गर्भागीरी (आजचा बालाघाट) परीसर होय.
खरंतर या भागाला “देवभूमी” च म्हणायला हवे. याच परीसरात श्री मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी, श्री कानिफनाथ संजीवन समाधी, श्रीक्षेत्र मोहटा देवी आणि श्रीक्षेत्र वृद्धेश्वर ही निसर्ग सौंदर्याने नटलेली जागृत पवित्र स्थाने आहेत.
या परीसरातील एक डोंगर दरी खोऱ्यात गर्भागीरीच्या कुशीत वसलेले गाव म्हणजे देऊळगाव घाट ता.आष्टी जि.बीड. बीड जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे परतु नगर शहराच्या जवळचे गाव. १९५०-१९६० च्या दशकापासून या गावातील अडाणी-अशिक्षीत, पण कष्टकरी, काटक,प्रमाणिक समाजाला शेतीसोबतच भक्तीच्या मार्गाकडे वळवून वारकरी संप्रदायाला आकार देणारी विभूती प्रातःस्मरणीय, पूजनीय रघुनाथ महाराज उंबरेकर !
पवित्र ते कुळ… पावन तो देश…. जिथे हरीचे दास…. जन्म घेती..।। रघुनाथबाबा मूळचे राहुरी तालुक्यातील उंबरे या गावचे. बारवेकर कुटुंबातील. सात्विक दाम्पत्याच्या पोटी जन्म आणि घरात पारमार्थिक वातावरण, यामुळे बाबांचा ओढा देखील लहानपणापासून भजनकीर्तनाकडे . वृद्धेश्वराच्या आदिनाथ भगवानाने त्यांना मोहिनीच घातली होती. वृद्धेश्वराहून घरी आणले, जवळच वांबोरी या गावी ते काहीकाळ राहिले तरी वृद्धेश्वर त्यांना खुणवत होते.
वृद्धेश्वरला असे काय विशेष होते की बाबा त्या स्थानाच्या प्रेमात पडले ? येथे सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे आदिनाथ भगवान म्हणजे महादेवाचे मंदीर आहे. डोंगरांच्या कुशीत हिरवाईने नटलेले हे स्थान आजही एकाकी आहे. पन्नास साठ वर्षांपूर्वी तर येथे घनदाट जंगल होतं. हिंस्त्र पशूंच्या वास्तव्यामुळे या बाजूला कोणी जात नव्हते. मंदिराजवळ ज्ञानवापी बारव आहे. वनवासाला जाताना प्रभू राम, लक्ष्मण, सीतामाई यांनी येथे वास्तव्य केले होते अशी श्रद्धा असल्यामुळे शेजारी उंचावर राममंदीर आहे. आजही आपण तेथे गेल्यावर आपले सात्विक भाव जागे होतात. अशा स्थानी रघुनाथबाबा आकर्षित झाले ही इश्वरी कृपाच म्हणावी लागेल.
रघुनाथबाबांनी पंचक्रोशीतील लोकांना पारमार्थिक दिशा दिली. हळूहळू भक्त परिवार मोठा झाला. बाबा आता लोकांचे झाले होते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.. देह कष्टविती परोपकारे..!!
१९६५ बाबांनी साली सुरू केलेला नारळी सप्ताह म्हणजे फिरता सप्ताह हे उंबरेकर मठाचे वैशिष्ट्य आहे. या वर्षीचा ६० वा नारळी सप्ताह बाबांचे लाडके गाव देऊळगाव घाट या ठिकाणी मोठ्या उत्साहात सुरु आहे. इवलेसे रोप लावियले द्वारी… त्याचा वेलू गेला गगणावरी…. याप्रमाणे बाबांनी लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
पैठण आणि पंढरपूरला दिंडी सुरू झाली. पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात हजारो वारकरी सामील होतात आणि भक्तीगंगेत डुंबत राहतात. उस तोडणी कामगार , शेतकरी आपले शारीरिक कष्ट, सांसारिक हालअपेष्टा काहीकाळ विसरून , “ज्ञानदेव-तुकाराम, एकनाथ-भानुदास, रामकृष्णहरी ” चा गजर करीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातो.
आपुले मरण पाहिले म्या डोळा. याप्रमाणें रघुनाथबाबा 1984 मध्ये समाधीस्त झाले. चाळीस दिवसाच्या सप्ताहाचे संपुर्ण नियोजन स्वतः केले. पत्रिका तयार झाल्या पण बाबांनी काल्याचे कीर्तनाच्या ठिकाणी कुणाचेही नाव टाकले नाही. भाविक म्हणाले बाबा तुमचं नाव पत्रिकेत राहीलं. आपण परत पत्रिका छापु .बाबा म्हणाले प्रिंट मिस्टेक आहे होत असते. आग्रह धरुन सुद्धा बाबांनी काल्याचं कीर्तनात स्वतः चे नाव टाकलं नाही.त्याचं गमक नंतर कळालं.
सर्व गावांना बाबां नी भेटी दिल्या. देऊळगाव घाट ला ही भेट देऊन गेले. सप्ताहाचा पहीला दिवस खुप समाज वृद्धेश्वर येथे जमलेला,सर्वांची लगबग .बाबा अगोदरचपासून म्हणायचे हे सगळं तुम्हाला करायचे आहे मी काहीही करणार नाही. विणा उभा करण्यासाठी भजन सुरू झालं बाबा भजनात तल्लीन झाले आणी राम कृष्ण हरी म्हणत देह ठेवला.
देह त्यागीता कीर्ती मागे उरावी आपल्या मृत्यूचाही चाळीस दिवस सोहळा बाबांनी आयोजित केला. खरंच जीवन असं जगावं की आपल्या मृत्यूचाही सोहळा व्हावा…. हेच बाबांनी दाखवून दिले.
गुरुवर्य पंढरीनाथबाबांनी २०२० पर्यत वारसा चालविला. सध्या बाबांचा वारसा चालवत असलेले हभप भागवत महाराज अतिशय तरुण,उत्साही आणि अभ्यासू आहेत. मोठ्या बाबांचे प्रतिबिंब आम्ही त्यांच्यात पाहतो.
बाबांवर देऊळगाव घाट करांनी विशेष प्रेम केले. बाबांचीही आमच्या गावावर कृपादृष्टी झाली. ऐशी कळवळ्याची जाती… करी लाभाविन प्रीती… यापूर्वी ३० वर्षापूर्वी १९९५ साली फिरता नारळी आमच्या देऊळगावी झाला होता. आज योगायोगाने ६० नारळी सप्ताह ही आमच्या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. परिसरामध्ये देऊळगाव घाट ची ओळख एका वेगळ्या उंचीची आहे. आणि या उंचीसाठी पाया भक्कम तयार करण्याचे कार्य बाबांनी केले आहे. आज अध्यात्मिक क्षेत्रामध्ये देऊळगाव घाट मध्ये अनेक राज्यस्तरीय नामवंत कीर्तनकार, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, प्रवचनकार महाराजांच्या कृपेने तयार झालेले आहेत. या गावांमधील अनेक तरुण सैन्य दलामध्ये भरती झालेले आहेत. शिक्षक, एस.टी.आय., पी.एस.आय. या पदावर देखील कार्यरत आहेत. एकंदरीतच या डोंगरातील माणसांना डोंगराएवढी उंची प्राप्त करण्यासाठी बाबांचे आशीर्वाद कामी आले.
काय सांगू आता संतांचे उपकार | मज निरंतर जागविती || काय द्यावे त्यासी व्हावे उतराई | ठेविता हा पायी जीव थोडा
आम्ही तशी डोंगरातील माणसे. आमच्या कडे बागायती, पाटापाण्याचा भाग कमी. परीणामी आमच्या कडे चिक्कू च्या बागा नाहीत. परंतु डोंगरावर उगवणाऱ्या टेंभुर्णाने आमची चिक्कूची उणीव भरून काढली. आमच्या कडे काजू सारखी महागडी झाडे पाण्याअभावी येत नाहीत, म्हणून आम्ही बिबीच्या फूलातच काजू पाहीले. द्राक्षाच्या तरी बागा या डोंगराळ प्रदेशात कशा येणार, म्हणून आम्हाला परमेश्वराने तत्सम करवंदाचे रसाळ फळ दिले.. अगदी द्राक्षासारखेच…… करवंद वरुन दिसायला काळे परंतु आतून रसाळ.. अमृताची चव… इथले माणसंदेखील करवंदासारखेच… वरुन दिसायला काळे, साधेभोळे.. परंतु आतुन मनाने निर्मळ…. बाबांचीच देण ही…. असो…
बाबांचा सहवास आमच्या गावाला मिळाला. परीसाचे नि संगे लोह होय सुवर्ण… तैसा भेटे नारायण संत संगे..
बाबा या परीसराला लाभलेले जणूकाय देवदूत च होते. बाबांनी हाच परीसर परमार्थासाठी का निवडला?
तर त्याचे हेच उत्तर सापडेल….
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलें । म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ॥
-विलास ठोंबरे देऊळगाव घाट