बजरंग सोनवणे यांनी पालकमंत्री आणि माजी पालकमंत्र्यांना ललकारले

बीड लोकसभा २०२४ /निवडणूक

आरोपी भाजपच्या स्टेजवर अन मराठा आंदोलकांवर तडीपारीची कारवाई

बीड /अंबाजोगाई/जवळगाव :- पालकमंत्री आणि भाजप उमेदवार यांनी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पैसे बुडविल्याच्या मुद्यावर बजरंग बप्पा सोनवणे जोरदार फटकेबाजी करत सडकून टिका केली. तसेच ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी भाजपच्या स्टेजवर आहेत. मात्र मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलेल्या तरुणांवर जिल्हा प्रशासन तडीपारीची कारवाई करीत आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन काय भाजपचे सालगडी आहे का ? असा सवाल त्यांनी प्रशासन आणि गृह खात्याला करीत प्रशासनाच्या वागणुकीचा समाचार घेत सरकारची वेशिला टांगली.

अंबाजोगाई तालुक्यातील मगरवाडी, धायगुडा पिंपळा, गिरवली, घाटनांदुर, जोडवाडी, उजनी, नागझरी, निरपणा सोमनवाडी, बाभळगाव, वाकडी, पट्टीवडगाव, तळेगाव घाट, लिंबागाव, या ठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी गावकऱ्यांनी बजरंग बप्पा सोनवणे आणि त्यांच्या सोबत असलेले बबन भाऊ गीते, राजेसाहेब देशमुख, रत्नाकर आप्पा शिंदे, अमर देशमुख, सुदामती गुट्टे, गोरे, ॲड. माधव जाधव आणि कालिदास आपेट हे परळी विधानसभा मतदार संघात प्रचार करीत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि त्यांच्या सोबतच्या मान्यवर नेत्यांचे गावकऱ्यांनी ढोल, ताशा, तुताऱ्या वाजवीत गावातून मिरवणूक काढली . तर अनेक गावात रस्त्यात थांबून महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले.
जवळगाव येथे जाहीर सभेत पुढे बोलताना बजरंग बप्पा सोनवणे यांनी पालकमंत्री आणि माजी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडवले. कामगारांना देशोधडीला लावले. ज्यांनी जिल्ह्यातील उद्योग धंदे बंद केले त्यासाठी मी संघर्ष करणार आहे . खासदार म्हणून ज्या वेळेस निवडून येईल. त्या वेळेस या पैसे बुडविनाऱ्यांच्या दारात बसून त्यांच्याकडून तुमचे पै-पै वसूल करीन असे आश्वासन त्यांनी दिले . भाजपा हा गुन्हेगारांना पोसणारा पक्ष असून भा दं वि ३०७ सारख्या जिवे मारण्याचा प्रयत्ना सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले आरोपी भाजपच्या स्टेजवर असतानाही पोलीस त्यांना अटक करीत नाहीत. म्हणजे काय जिल्ह्याचे पोलीस खाते भाजपचे सालगडी झाले आहे की काय ? अशी जळजळीत टीका त्यांनी पोलीस प्रशासनावर केली.
मी शेतकरी पुत्र असल्याचा अभिमान आहे असेही ते म्हणाले. त्याच बरोबर जिल्हा सहकारी बँकेस बाबत बोलताना त्यांनी सांगितले २००९ मध्ये ज्या भाजपच्या नेत्यांनी बँक बुडवली ते सर्व भाजपच्या स्टेजवर दिसतात. त्या सर्वांच्यावर कारवाई झालेली आहे. त्याच बरोबर २००९ ला जिल्हा बँक बुडवली. २०१४ मध्ये वैजनाथ कारखाना बंद झाला आहे. २०१९ ला पन्नगेश्वर बंद पडल आणि आता या निवडणुकीत जनता तुम्हाला घरी बसवेल असा आशावाद व्यक्त केला . त्याच बरोबर आता नाहीतर पुन्हा कधीच नाही कारण या नंतर मात्र मोदी आणि शहा देशांमध्ये निवडणुका घेतील की नाही ? अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली.
लोकशाही टिकवायचे असेल तर यावेळी आलेल्या संधीचे सोने करून भाजपला नामोह हरम करा. बीड जिल्ह्यामध्ये आमदार, खासदार आणि मंत्रीपदही त्यांना एकाच घरात हवे आहेत. स्वतःपुरते राजकारण करण्यासाठीच ते जातीवाद करीत असल्याचे त्यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील नेत्यांचे प्रारब्ध ही जनता ठरवेल असा टोलाही त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला .