मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण

🔷 निवडणूक अधिकारी यांची पत्रकार परिषदेत महिती

बीड-परळी वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क / 39 बीड लोकसभा मतदार संघ अंतर्गत 233 परळी विधानसभा मतदार संघात निवडणुकीची सूक्ष्मपणे परिपूर्ण नियोजन करण्यात आले असून रविवार दि 5 रोजी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. एकूण 3 लाख 26 हजार 374 मतदार 342 मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावणार असून याकामी 2 हजार 836 अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

बीड लोकसभेच्या परळी विधानसभा मतदार संघात असलेल्या परळी,अंबाजोगाई तालुक्यातील मतदारासाठी 342 मतदान केंद्र असणार आहेत. ज्या मध्ये संपूर्ण महिला कर्मचारी असलेले सखी केंद्र 5 असणार असून 3 परळी शहरात तर 2 घाटनांदूर येथे असणार आहेत. संपूर्ण दिव्यांग कर्मचारी असलेले 1 केंद्र परळी शहरात असणार आहे. 342 पैकी 4 मतदान केंद्र हे संवेदनशील असून यावर प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले गेले आहे. या लोकसभा निवडणुकीत 22 हजार 340 मतदार संख्या वाढून 3 लाख 26 हजार 374 एवढी झालेली असून या मतदारांचे मतदान प्रक्रिया सुलभपणे निर्भीड,निकोप वातावरणात संपन्न व्हावी यासाठी तब्बल 2 हजार 836 अधिकारी, कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत.निवडणूक प्रक्रियेकरिता 490 कंट्रोल युनिट, 1 हजार 248 बॅलेट युनिट आणि 529 व्हीव्ही पॅड मशीन वापरण्यात येणार आहेत.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिये दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सीआरपीएफ चे 90 जवान आणि 450 पोलीस अधिकारी, कर्मचारी लक्ष देऊन असणार आहेत तर 2 शासकीय वाहन, एस.टी महामंडळाच्या 29 बसेस, 18 खाजगी मिनी स्कुल बस, 6 खाजगी जीप तर क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी 36 खाजगी क्रूझर वाहन वापरात येणार आहेत.सर्वात कमी मतदार असलेले मतदान केंद्र मलकापूर हे तर सर्वाधिक मतदार असलेले केंद्र इमदादूल उलूम हे असणार आहे.या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान निरीक्षण करण्यासाठी एस.एस.टी 9, एफ.एस.टी 9, व्ही.व्ही.टी 1, ए. टी 1 व व्हि.एस.टी 5 असे 25 पथक देखरेख करणार आहेत.

39 बीड लोकसभा मतदार संघ अंतर्गत 233 परळी विधानसभा मतदार संघातील सोमवार दि 13 मे 2024 रोजी संपन्न होणार असलेल्या या निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी रविवार दि 5 रोजी पत्रकार परिषद संपन्न झाली. या वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी
अरविंद लाटकर (उपविभागीय अधिकारी), व्यंकटेश मुंडे (तहसिलदार,परळी),बाबुराव रुपनर (नायब तहसीलदार, परळी) यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय बीड व उपविभागीय कार्यालय परळी येथील निवडणूक विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.