परळी शहरात मतदानावर बहिष्कार

1984 पासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित

🔶 समस्या/प्रलंबीत प्रश्न/ अक्षम्य दुर्लक्ष/पोरखेळ उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांना निवेदन.

🔶 तत्कालीन जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांची तीन वेळेस तर विद्यमान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची पाच वेळेस या भागातील रहिवाशांनी घेतली भेट

 🔶 शहरातील बजरंग नगर, प्रियानगर, जिरगे नगर, मथुरा नगर, समतानगर नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

बीड/परळी-वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क :– परळी शहरातील अंबाजोगाई रस्त्यालगत असलेल्या बजरंग नगर, प्रियानगर, जिरगे नगर, मथुरा नगर, समतानगर या भागातील नगर परिषद परळी वैजनाथ विकास आराखडा 100 फुट रुंदीचा व विद्यानगर- तहसील कार्यालय-चर्च मार्ग 40 फुट रुंदीचा रस्त्याचे डांबरीकरण , सिमेंट बांधकाम होत नसल्यामुळे बीड लोकसभा निवडणुक 2024 च्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या भागातील नागरिकांनी घेतला आहे. दि. 8 मे 2024 रोजी परळीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांना एका निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.

याबाबत उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रा. संपत वामनराव वाघमोडे, परमेश्वर गित्ते यांच्यासह बजरंग नगर, प्रियानगर, जिरगे नगर, मथुरा नगर, समतानगर परळी वै ता. परळी वै जि.बीड येथील रहिवासी यांनी सदरील रस्त्याच्या कामाबाबत 15 ऑगस्ट, 17 सप्टेंबर 1 मे कामगार दिन तसेच 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनी परळी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. परंतु तहसील प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेतले होते. तसेच या रस्त्याच्या कामाबाबत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनाही भेटून निवेदन दिले होते. अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही सदरील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने या भागातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

🔺दोन ते अडीच हजार मतदार या भागात आहेत. रस्त्याचे काम होत नसल्याने प्रशासनाने वारंवार उदासीनता दाखवल्याने या भागातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

🔺निगरगट्ट व गेंड्याची कातडी पांघरलेले प्रशासन तसेच राजसत्तेची जोड असेल तर कुठलाच प्रश्न मिटू शकत नाही. हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. सतत लोकशाही मार्गाने आंदोलने, निवेदने देऊनही 1984 पासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. नागरिकांना प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा 2024 च्या निवडणुकावर अक्षरशः मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे हे लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल

🔷 पालकमंत्र्यांना निवेदन… अनेक वेळा धरने

पालकमंत्र्यांना निवेदन देऊनही रस्त्याचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. बजरंग नगर, प्रियानगर, जिरगे नगर, मथुरा नगर, समतानगर या भागातील नागरिकांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना परळी येथील चेंम्बरी रेस्ट हाऊस सदरील भागातील 500 नागरिकांनी भेटून निवेदन दिले होते. परंतु अद्यापही हा प्रश्न निकाली निघाला नाही. याची दखल घेतली गेली नाही. असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.

……………………………………………………………………………..

🔹सदर विभागातील रस्त्या चा भूसंपादनाचा प्रश्न आहे ज्यांच्या जागेतून रस्ता जाणार आहे त्यांनी मावेजा मिळाल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. राज्य नगर उत्थान योजनेत हा रस्ता आम्ही प्रस्तावित करत आहोत.

त्रिंबक कांबळे
मुख्याधिकारी, नगरपरिषद,
परळी वैजनाथ.

🔸…………………………………………………………………….

🔻सदर रस्त्याबाबत आणि त्याच्या भूसंपादराबाबत न प चे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. हा रस्ता न.प.च्या अखत्यारीत आहे. सर्व कायदेशीर बाबीची चौकशी करून महिनाभरात लेखी अहवाल देण्याबाबत मुख्याधिकारी यांना सुचित केले आहे. निवेदनकर्त्यांशी बोलून मतदानावरील त्यांच्या बहिष्कराबाबत त्यांचा मन वळवण्याचा प्रयत्न करत आहोत.

अरविंद लाटकर
एस डी एम, परळी वैजनाथ.